BIG NEWS : खंडणीसाठी पुण्यात तिघांचं अपहरण, धागेदोरे नगरमधील सरपंचापर्यंत…

166

पुणे : ५० लाखांच्या खंडणीसाठी मार्केट यार्डातून गुरुवारी दुपारी तिघांचे अपहरण झाल्याची घटना समोर आली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत अपहरणकर्त्याला ताब्यात घेतले, तर अपहरण झालेल्या तिघा जणांची सुटका केली आहे.

या अपहरण नाट्याला आता वेगळे वळण लागले असून, या प्रकरणाचा मास्टरमाईंड आदेश नागवडे हा श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी गावचा सरपंच असल्याचे समोर आले आहे. सध्या तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अपहरण झालेल्या पीडितांकडे सरपंचाने काळे पैसे पांढरे कारण्यासाठी ३४ लाख रुपये दिले होते. प्रोसेसिंग फी आणि टोकन अमाऊंटच्या नावाखाली हे पैसे त्यांनी घेतले होते.

सरपंचाला १० कोटी रुपये पांढरे करून हवे होते. मात्र ठरल्याप्रमाणे पीडित व्यक्तीने त्यांना काळ्याचे पांढरे पैसे करून दिले नाहीत. त्यामुळे सरपंच व त्याच्या साथीदारांना संशय आला. त्यातूनच त्यांनी या तिघांचे अपहरण केल्याचा आरोप आहे.

याप्रकरणी, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पाच पथकांनी तांत्रिक विश्लेषण व नगर पोलिसांच्या मदतीने तिघांना काही तासात श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील एका लॉजवरून ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी अपहरणकर्ते प्रवीण शिर्के, विजय खराडे आणि विशाल मदने (रा. तिघेही. नगर) अशी पकडण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. तर, त्यांचे इतर साथीदार फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

या प्रकरणी शुक्रवारी (दि.13) मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात तिघे संशयित आरोपी व त्यांच्या सहा ते सात साथीदारांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका अपह्रत व्यक्तीच्या भावाने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपह्रत व्यक्तीमधील एक जण फिर्यादींचा भाऊ आहे. ते मूळचे मुंबई साकीनाका येथील राहणारे आहेत. तेथील एका कंपनीत ते प्रतिनिधी म्हणून काम करतात, तर इतर दोन व्यक्तींमध्ये एक नातेवाईक तर तिसरा त्यांचा मित्र आहे.

कंपनीच्या कामानिमित्त ते पुण्यात आल्याची माहिती आहे. गुरूवारी दुपारी ते मार्केटयार्ड परिसरात आले असताना, बारा वाजताच्या सुमारास दोन चारचाकी गाडीतून त्यांचे वास्तूश्री कॉम्पलेक्स समोरून तिघांचे अपहरण करण्यात आले होते.

दरम्यान अपहरणकर्त्यापैकी एकाने व्हॉट्सअपद्वारे व्हिडीओ कॉल करून कंपनी प्रतिनीधी असणार्‍या प्रमुख अपह्रत व्यक्तीच्या भावाला फोन करून तिघांचे अपहरण केल्याची माहिती दिली.

तसेच त्यांना मारहाण करत असल्याचे देखील दाखवले. त्यानंतर तिघांना सोडवायचे असल्यास पुण्यातील एम. जी. रस्ता येथील एका अंगडीयाकडे ५० लाख रुपये खंडणी देण्याची मागणी आरोपींनी केली.

त्यानंतर फिर्यादींनी शुक्रवारी (दि.13) सकाळी मार्केटयार्ड पोलिसांना याची माहिती दिली. अपहरणाची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने पाच पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. प्रत्येकाला विभागून काम देण्यात आले.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यावरून आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपी हे श्रीगोंदा येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार पथकाने नगर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून श्रीगोंदा येथील एका लॉजमधून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी काही आरोपी पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

आरोपाींच्या ताब्यातून एक फॉर्च्युनर आणि एक क्रेटा अशा दोन चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर, क्रांतीकुमार पाटील, अजय वाघमारे, बालाजी पांढरे उपनिरीक्षक मोहन जाधव सहाय्यक निरीक्षक मदन कांबळे, कर्मचारी शैलेश सुर्वे, सचिन अहिवळे, सैदोबा, भोजराज चेतन आपटे, विनोद साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही कारवाई केली.

अपह्रत व्यक्तीच्या एकाच्या भावाकडे पन्नास लाखांची मागणी करण्यात आली होती.

पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच काही तासांच्या आत श्रीगोंदा येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या कारणासाठी अपहरण केले, त्यांचे इतर साथीदार याबाबत सखोल तपास सुरू आहे, अशी माहिती रामनाथ पोकळे (अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा) यांनी दिली.

BIG NEWS : पुण्यासह राज्यभरात वाढल्या अशा घटना; मोबाइलवर…