‘शिट्टी वाजली’ या कार्यक्रमाद्वारे अंकिता लोखंडे करणार मराठीत पदार्पण

205

मराठी चित्रपट प्रसारित करणारी एकमेव लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज एका दशकापेक्षा जास्त प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. या वाहिनीने फक्त सदाबहार आणि नवनवीन सिनेमेच प्रसारित केले नाहीत तर म्युजिक, कॉमेडी आणि मराठी नाटकांशी संबंधित लक्षवेधक शो टिव्हीवर सादर करून प्रेक्षकांना त्यांच्या टिव्ही स्क्रिनला खिळवून ठेवले आहे. कम्प्लिट एन्टरटेनमेंट पॅकेज असलेल्या झी टॉकीज वाहिनीला प्रेक्षकांचे प्रेम आणि अखंड पाठिंबा मिळत आला आहे.

येत्या रविवारी झी टॉकीज आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी शिट्टी वाजली हा खास कार्यक्रम प्रसारित करणार आहे. अगदी नावाप्रमाणेच हा कार्यक्रम फुल टू धमाल असणार आहे. आपल्या लाडक्या कलाकारांचे बहारदार नृत्याविष्कार हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे. अंकिता लोखंडे हिचा कॅब्रे डान्स या कार्यक्रमात चार चांद लावणार आहे. अंकिताने पवित्र रिश्ता या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. आता ती मनकर्णिका या चित्रपटात झळकणार आहे. अंकिता हिंदीत चांगल्या भूमिका साकारत असली तरी ती मराठी चित्रपटसृष्टीपासून दूर होती. पण ती पहिल्यांदाच मराठी वाहिनीवर नृत्य सादर करणार आहे. तसेच शिट्टी वाजली या कार्यक्रमात दीपाली सय्यदचा मुजरा देखील तितकाच मनमोहक असणार आहे. सैराट फेम रिंकू राजगुरू देखील या कार्यक्रमात सहभागी झाली असून संगीत सम्राट पर्व 2 चे कॅप्टन अभिजित कोसंबी या कार्यक्रमात परफॉर्म करणार आहेत. अभिनेत्री ऋतुजा शिंदे ही मराठी गाण्यांवर एक धमाकेदार डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे. मयुरेश पेम, तेजा देवकर आणि ऐश्वर्या बदडे हे तिघे आदर्श शिंदेच्या लोकप्रिय गाण्यांवर ठेका धरणार आहेत तसेच अभिनेत्री मीरा जोशी ही हिंदी गाण्यांवर नृत्य सादर करून सगळ्यांवर भुरळ पडणार आहे.

शिट्टी वाजली या कार्यक्रमाचा हा भाग प्रेक्षकांना रविवारी 2 सप्टेंबरला संध्याकाळी सात वाजता फक्त झी टॉकीजवर पाहायला मिळणार आहे. हा भाग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे.