अभिजित आणि आसावरीच्या प्रेमाला प्रेक्षकांची पसंती

250

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेला पाहता पाहता प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी. या सगळ्यामुळे ही मालिका अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय.

प्रेक्षकांना मालिकांमध्ये नवनवीन गोष्टी हव्या असतात. त्यामुळे मधल्या टप्प्यावर असणाऱ्या अभिजीत आणि आसावरी यांची प्रेम कथा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. मालिकेतील संवाद देखील खूप हृदयस्पर्शी असून त्यांचा प्रभाव प्रेक्षकांवर पडतोय. कलाकारांचा अप्रतिम अभिनय आणि त्याला असलेली प्रभावी संवादाची जोड हे या मालिकेच्या यशाचे गमक आहे असे म्हंटले तर खोटे ठरणार नाही.

याबद्दल बोलताना अभिनेता डॉ. गिरीश ओक म्हणाले, “आपल्या समाजात स्त्रीला अनेकदा दुय्यम स्थान दिलं जातं. अविवाहित राहिलेल्या किंवा विधवा स्त्रिया लग्न करतात, तेव्हा त्यांना समाजाकडून मान्यता मिळत नाही. आमची मालिका वेगळं प्रेम, नात्याची गोष्ट सांगतेय. प्रेमाचा अधिकार सर्वांनाच आहे. कलाकार म्हणून ही गोष्ट समाजापर्यंत पोहोचवणं मला गरजेचं वाटतं.”