यंदा गणेशमूर्ती उद्योगाला ‘जीएसटी’चा फटका, मूर्तीकलेला घरघर

160
आठ दशकांपेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेल्या नंदुरबारमधील गणेशमूर्ती उद्योगाला ग्लोबल टच मिळू लागला आहे. चार वर्षांपूर्वी थेट आखाती देशात व दक्षिण आफ्रिकेत येथील मूर्ती पाठविण्यात आल्या होत्या. यंदादेखील गुजरात, मध्य प्रदेश राज्यात मूर्ती पाठवल्या जात आहेत. ३५ पेक्षा अधिक लहान-मोठ्या कारखान्यांमधून एक इंचापासून ते २० फुटापर्यंतच्या हजारो मूर्ती येत्या गणेशोत्सवासाठी आकारास येत आहेत. परंतु यंदा जीएसटीचा फटका मूर्ती उद्योगाला बसला आहे. एकीकडे मूर्ती तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि दुसरीकडे मूर्ती विक्रीची किंमत याचा ताळमेळ घालताना मूर्तीकारांचा गोंधळ उडत आहे.
कलर व पीओपीवर जीएसटी मूर्ती तयार करण्यासाठी महत्त्वाचे घटक असलेल्या कलर व पीओपीवर अनुक्रमे २८ व १८ टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्हीच्या किमती जबर वाढल्या आहेत. नंदुरबारातील मूर्ती कारागीर इंदूर किंवा सूरत येथून ठोक भावात कलर व पीओपी मागवत असतात. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही वस्तू जवळपास २० ते २५ टक्के अधिक किमतीत खरेदी कराव्या लागत आहेत. मूर्ती तयार करण्याच्या घटकातीलच एक असलेल्या काथ्याची किंमतदेखील वाढली आहे. गेल्यावर्षी ३० किलोचा गठ्ठा १ हजार १५० रुपयांना मिळत होता, यंदा तो १ हजार ६५० रुपयांना मिळत आहे. अर्थात ५०० रुपयांची वाढ त्यात झाली आहे.
मूर्ती कारागिरांची मेहनत, मजुरांचा पगार, वीज बिल, जागेचे भाडे आणि इतर बाबी यांचा विचार करता मूर्तीच्या किमतीत यंदा वाढ होणे अपेक्षित होते. परंतु जिल्ह्यासह गुजरात व मध्य प्रदेशातील नेहमीची मंडळे मूर्ती बुक करण्यासाठी येताना गेल्या वर्षाच्या किमतीतच मूर्ती बुक करण्याचा आग्रह धरत आहेत. त्यामुळे परवडत नसतानाही कारागिरांना किमतीबाबत समायोजन करुन किमती स्थिर ठेवाव्या लागत आहेत. यावेळी उत्तर महाराष्ट्र्रात दुष्काळी स्थिती आहे. त्यामुळे गणेश मंडळांची आर्थिक स्थिती खराब असल्याने गणेश भक्त कमी पैशात मूर्तींची मागणी करत असतात. नंदुरबारच्या  गणेशमूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त येत असतात. मूर्ती कलेला विविध अडचणींमुळे घरघर लागली आहे. शहरात ३० ते ३५ मूर्ती कारागीर असून त्यांच्या कारखान्यांसाठी जागा नाही. वीज बिलात सवलत नाही. कला म्हणून न पाहता व्यवसाय म्हणून पाहिले जात असल्यामुळे मूर्ती कलेला घरघर लागली आहे, अशी भावना व्यक्त केली जात आहे.