पुणे : पबजी गेम, टिक टॉकच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या

157

पुण्यातील बिबवेवाडी येथील १६ वर्षांचा तरुण मागील काही दिवसांपासून पबजी गेम आणि टिक टॉकच्या आहारी गेला होता. अखेर या गेमच्या अतिवापरातून त्याने आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याचे स्थानिकांचे म्हणने आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आत्महत्या करण्याअगोदर देखील, त्या तरुणाने टीकटॉक व्हिडिओ तयार केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात एक तरुण आजी सोबत राहत होता. आजी घरकाम करून घर सांभाळत होती. तर आत्महत्या केलेल्या तरुणाने १० दिवसांपूर्वी नवीन मोबाईल घेतला होता. त्याला पबजी गेम सतत खेळण्याची आणि टीकटॉक व्हिडिओ करण्याची सवय होती. त्याची आजी पबजी गेम आणि टीक टॉक व्हिडिओवरून त्याला सतत ओरडत असत. मात्र त्याकडे तो दुर्लक्ष करत होता. अखेर या गेमच्या वेडातच त्याने मंगळवारी पहाटेच्या सुमारास स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असल्याचे सांगितले जात आहे. काही वेळाने आजी स्वयंपाकघरात आल्यावर हा प्रकार तिच्या निदर्शनास आला. या घटनेचा तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.