महिला सक्षमीकरणासाठी ब्रिजस्टोन, ‘फिक्की फ्लो’चा पुढाकार : पराग सातपुते

239

ब्रिजस्टोन, हेडीडी व फिक्की फ्लो यांच्यातर्फे २०० महिलांना प्रशिक्षण

पुणे : “महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले, तर संपूर्ण कुटुंब प्रगती करते. त्यामुळे ब्रिजस्टोन इंडियाने महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. सरकारने ‘सीएसआर’ बंधनकारक केला म्हणून ब्रिजस्टोन हे करत नसून, संस्थेच्या स्थापकांनी समाजाच्या विकासात योगदान देण्याचे सूत्र बांधलेले आहे. त्यामुळे ‘सीएसआर’च्या पलीकडे जाऊन आम्ही काम करत आहोत. भारतातील महिलांना सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून, फिक्की फ्लो हे अतिशय योग्य व्यासपीठ आहे. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून फिक्की फ्लोबरोबर विविध उपक्रमात एकत्रित काम करत आहोत. येत्या ८ डिसेम्बरला मगरपट्टा सिटीमध्ये होत असलेल्या हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून या महिला रायडर्स आपले कौशल्य दाखवतील. भविष्यातही अनेक उपक्रम राबवून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे मत ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पराग सातपुते यांनी व्यक्त केले.

गेल्या वर्षीच्या फ्लो हाफ मॅरेथॉनमधून उभा राहिलेल्या निधीतून ब्रिजस्टोन इंडिया, हेडीडी आणि फिक्की फ्लो पुणे चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने २०० महिला रायडर्सना कौशल्य आणि नोकरी प्रशिक्षण वर्ग राबविण्यात आले. त्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात पराग सातपुते बोलत होते. पुणे स्टेशनजवळील हॉटेल शेरेटॉन ग्रँड येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी  ब्रिजस्टोनचे कार्यकारी संचालक अजय सेवेकरी, फिक्की फ्लो पुणेच्या अध्यक्षा रितू प्रकाश छाब्रिया, वरिष्ठ उपाध्यक्षा अनिता सणस, उपाध्यक्षा उषा पूनावाला, खजिनदार राणू कुलश्रेष्ठ, सहखजिनदार अनिता अग्रवाल आदी उपस्थित होते.

रितू छाब्रिया म्हणाल्या, “ब्रिजस्टोन, हेडीडी आणि फिक्की फ्लो या तिन्ही संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे या २०० तरुण महिला रायडर्सचे प्रशिक्षण पूर्णत्वास गेले. या महिलांना एका नव्या क्षितिजाकडे झेप घेण्याचे पंख मिळाले, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आणि आर्थिक स्थैर्यही या उपक्रमामुळे शक्य झाले आहे. पुणे चॅप्टर पुढील काळातही महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवणार आह. त्याचाच भाग म्हणून ब्रिजस्टोन, टाटा स्ट्राइक आणि फिक्की फ्लो यांच्यामध्ये १४७ मुलींना प्रशिक्षण देण्यात येत आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी होत असलेल्या हाफ मॅरेथॉनमधून उभा राहणार निधी महिला सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे.”

“मी हेडीडीसोबत काम करत आहे. या रायडिंग प्रशिक्षणामधून मला खूप काही शिकायला मिळाले. माझा आत्मविश्वास वाढला. शिवाय मी आता आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनत आहे, याचा मला आनंद वाटतो. या संधी आणि प्रशिक्षणाबद्दल ब्रिजस्टोन आणि फिक्की फ्लो संस्थेचे आभार व्यक्त करते,” अशी भावना एका प्रशिक्षणार्थी तरुणीने व्यक्त केली.