धावत्या कारमध्ये सैनिकाने मुलांसमोरच पत्नी आणि मेव्हणीची गोळी झाडून केली हत्या

249

लष्करी सेवेत असलेल्या जवानाने धावत्या गाडीत मुलांसमोरच पत्नी आणि मेव्हणीची गोळी झाडून हत्या केली. नंतर स्वत:ला संपवले. पाटण्याच्या सायदाबाद भागात रविवारी ही धक्कादायक घटना घडली. विष्णू कुमार शर्मा (३३) असे मृत जवानाचे नाव असून तो गुजरातमध्ये तैनात होता. अलीकडे सुट्टीवर तो घरी आला होता.

विष्णूने पत्नी दामिनी आणि तिची बहिण डिम्पल शर्माची गोळी झाडून हत्या केली. पालीगंजचे पोलीस उपधीक्षक मनोज कुमार पांडे यांनी ही माहिती दिली. दोघींची हत्या केल्यानंतर विष्णूने स्वत:वर गोळी झाडली. मागच्या दोन महिन्यांपासून विष्णू डेंग्युच्या तापाने त्रस्त होता. आजारपणामुळे त्याची चिडचिड सुद्धा वाढली होती. उपचारासाठी म्हणून तो पाटण्याला आल्याचे तपासातून समोर आले आहे.

गाडीमध्ये विष्णूसोबत त्याची मुले सुद्धा होती. मुले आजोबांसोबत पुढच्या सीटवर बसल्याने बचावली. घटनास्थळावरुन पोलिसांनी बंदूक, विष्णूचे ओळखपत्र आणि कार ताब्यात घेतली आहे. हत्येसाठी जी बंदूक वापरली त्याचा परवाना होता. वडिलांनी आधी मावशीवर गोळी झाडली त्यानंतर आई आणि स्वत:वर गोळी झाडून घेतली. आजोबा कसेबसे गाडीतून उतरले व त्यांनी स्थानिकांची मदत घेतली असे विष्णूच्या मोठया मुलाने सांगितले.