‘शिवशाही’चे सहा महिन्यांत २२१ अपघात

227

एसटी महामंडळात दाखल झालेल्या वातानुकूलित शिवशाही बसचे एप्रिल २०१९ ते सप्टेंबर २०१९ या सहा महिन्यांत २२१ अपघात झाले आहेत. यातील ७४ अपघातांमध्ये प्रवाशांचा मृत्यू तसेच प्रवासी जखमी झाल्याची नोंद आहे. गेल्या वर्षांतील सहा महिन्यांच्या तुलनेत अपघातांत घट झाली असली तरी ते पूर्णपणे रोखण्यात महामंडळाला अपयश आले आहे. त्यामुळे अपघातांचे गांभीर्य आणि ते रोखण्यासाठी नियोजन करण्यासाठी एसटीच्या सर्वच चालकांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहे.

खासगी प्रवासी वाहतूकदारांनी निर्माण केलेल्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी एसटी महामंडळाने जून २०१७ मध्ये वातानुकूलित शिवशाही बस ताफ्यात दाखल केली. स्वत:च्या मालकीच्या आणि भाडेतत्त्वावर शिवशाही बस टप्प्याटप्यात एसटीत दाखल केल्या. पण अपघात, बसचा वेग, अस्वच्छता इत्यादी कारणांमुळे शिवशाही बस सेवा चर्चेत राहिली.

१ एप्रिल ते ३० सप्टेंबपर्यंत शिवशाही बसचे एकूण २२१ अपघात झाले आहेत. यात एसटीच्या स्वमालकीच्या शिवशाही बसचे १३६ आणि  भाडय़ाच्या शिवशाहीचे ८५ अपघात झाल्याची नोंद आहे. स्वमालकी बसच्या १३६ अपघातांमध्ये ३५ घटनांमध्ये प्रवाशांच्या मृत्यू आणि जखमींची नोंद आहे. तर उर्वरित दुर्घटनांमध्ये प्रवाशांना कोणतीही दुखापत झालेली नाही. भाडेतत्त्वावरील शिवशाहीच्या ८५ अपघातांमध्येही ३९ अपघातांत प्रवासी मृत्यू आणि जखमी झाल्याचे एसटी महामंडळाने सांगितले. एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ शी तुलना करता यंदाच्या वर्षांत दुर्घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र महामंडळाला शिवशाहीचे अपघात पूर्णत: रोखण्यात यश आलेले नाही. २०१८ मधील सहा महिन्यांत शिवशाही बसचे एकूण २४० अपघात झाले होते.

एसटी महामंडळाकडे शिवशाही अपघातांतील प्रवासी मृत्यू आणि जखमींची नेमकी माहिती मात्र उपलब्ध होऊ शकली नाही. यंदा आणि गेल्या वर्षी शिवशाही अपघातांमध्ये किती प्रवाशांचे मृत्यू व जखमी झाले याची माहिती काढावी लागणार असल्याचे सांगण्यात आले