राष्ट्रवादीचे अजून इतके आमदार नॉट रिचेबल, मोठ्या नेत्याने केलं स्पष्ट

139

मुंबई, 23 नोव्हेंबर : भाजपला मदत करणाऱ्या अजित पवार यांच्यावर राष्ट्रवादीने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. अजित पवारांनी बैठकीला हजर असल्याचे पत्र दाखवून भाजपला मदत केल्याचा खुलासा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी  केला आहे. तसंच 5 आमदार हे संपर्कात नसल्याचं मान्य केलं आहे.मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीमध्ये अजित पवारांना विधिमंडळाच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा ठराव एकमताने घेण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली. तसंच अजित पवार यांनी बैठकीला हजर राहण्यासाठी आमदारांनी पत्रं दिलं होतं. ते पत्र दाखवून भाजपला मदत केली असल्याचा दावाही मलिक यांनी केला.तसंच चोरी चोरी-चुपके चुपके स्थापन झालेलं सरकार हे टिकणार नाही. विधिमंडळात बहुमत सिद्ध करताना आम्ही भाजपचा पराभव करून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच सरकार स्थापन होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.दरम्यान, या बैठकीआधी राष्ट्रवादीने एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये अजित पवार यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. आमदारांना व्हीप जारी करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. परंतु, ते अजून पक्षात आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची याचे सर्व अधिकार शरद पवार यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या पुतण्यावर शरद पवार काय कारवाई करता हे पाहण्याचं ठरणार आहे. दरम्यान, हा निर्णय घेण्याच्याआधी  राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे यांनी अजित पवारांची भेट घेतली आणि मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. तसंच सुप्रिया सुळे यांनीही अजित पवारांशी चर्चा केली. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर राहण्याची सुचना देण्यात आली होती पण अजितदादांनी बैठकीला हजर राहण्यास नकार दिला अजित पवार यांनी आपल्याच पक्षातील 11 आमदार फोडून भाजपच्या गोटात सामील झाले. पण, आता अजित पवार एकटे पडल्याचं चित्र पाहण्यास मिळत आहे. एकापाठोपाठ फुटलेले आमदार माघारी परतले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी  संजय बनसोडे या आमदाराला थेट विमानतळावरून ताब्यात घेतलं. तसंच अनिल पाटील यांनाही सोबत घेतलं. या दोन्ही आमदारांनी यशवंत चव्हाण सेंटरवर स्वत: घेऊन आले.भाजपने अखेर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपच्या या खेळीच्या विरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. तिन्ही पक्षांकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये रीट याचिका दाखल केला आहे. सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया ही बेकायदेशीर आहे. राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट मागे घेणे आणि फडणवीस यांचा शपथविधी घेण्याच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये महाविकासआघाडीकडे पूर्ण बहुमत आहे, त्यासाठी राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या याचिकेमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महाविकासआघाडीचा उल्लेख करण्यात आला आहे.