पुण्यावर धुक्याची चादर!

266

पुणे | अवकाळी पावसानं नको-नको केलं असताना शहर व परिसर शनिवारी दाट धुक्‍यात हरवला होता. त्याचबरोबर थंडीचीदेखील चाहुल लागली आहे. सकाळी पडलेलं दाट धुके, थंडी आणि दव असा अनुभव नागरिकांना आला. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत असं दृश्‍य शहर व परिसरात होतं.

सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत धुक्‍याची चादर पसरल्यानं पंधरा-वीस फुटांवरील काही दिसत नव्हतं. त्यामुळं दुचाकी व चारचाकी वाहनांना दिवे सुरू ठेवावे लागले. बच्चे कंपनीला हा अनुभव नवा असल्याने, हे दृश्‍य पाहिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आश्‍चर्याचा भाव दिसत होता. आकाशातील ढग जमिनीवर उतरल्याचा भास होत असल्याचे दृश्‍य पहायला मिळाले.

जिल्ह्यात अवकाळी परिसरानं धुमाकूळ घातला होता.

विधानसभा निवडणूक मतदान आणि दिवाळीदेखील पावसाच्या सावटाखाली झाली. नोव्हेंबरमध्ये थंडीची चाहुलही न लागल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर व परिसरात थंडीची चाहुल लागली असून, धुकंदेखील पडत आहे.

सध्या हवामान कोरडं असल्यामुळंच आगामी काळात तापमानात घट होण्याची शक्‍यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. गुरुवारी शहरातील किमान तापमान 19 अंश सेल्सिअस होतं. शुक्रवारी ते 18, तर शनिवारी आणखी घट होऊन 17 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं होतं.