पुण्यात चंपा साडी सेंटरचं राष्ट्रवादीकडून उदघाटन

266

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कोथरूड चर्चेत आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये साडी वाटप केल्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीकडून प्रतिकात्मक चंपा साडी सेंटरचं उद्घाटन करण्यात आले. बुधवारी सकाळी डेक्कन येथील खंडोजी बाबा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आणि आमदार चेतन तुपे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. ‘चंपा साडी हाय हाय’, ‘आम्हाला हवी विकासाची गाडी, नको आम्हाला चंपा साडी’, यासारख्या घोषणा देत भाजपाच्या साडी वाटपाला विरोध दर्शवला.

भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाऊ बीज सणाच्या निमित्ताने एक लाख महिलांना साडी वाटप केलं. त्यावेळी पाटील यांच्या या उपक्रमाचा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेकडून निषेध नोंदविण्यात आला होता.

यंदाची दिवाळी कष्टकरी, गरजूंबरोबर साजरी करावी, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार राज्यातील अनेक भागांत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून कोथरूडमधील कष्टकरी महिलांचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाला साडी देण्याचे आवाहन केले. साधारणपणे दहा हजार साडय़ा जमा होणार असून त्याचे वाटप करण्यात येणार आहे. असे चंद्रकांत पाटील यावर म्हणाले.

यावर कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून लढणारे मनसेचे उमेदवार किशोर शिंदे म्हणाले की, सांगली, कोल्हापूर, पुणे या शहरांत अतिवृष्टी झाली. पुराचा फटका अनेकांना बसला. या भागातील महिलांना साडी तसेच अन्य वस्तूंचे वाटप करण्याची आवश्यकता होती. साडीवाटप योजना म्हणजे आमिष दाखविण्याचा प्रकार आहे. विकासाचे राजकारण करणाऱ्या भाजपला साडीवाटपाची गरज का पडली?