तिकीट कसली वाटताय… पुण्यातला पूर पहा…

132

मुंबई : पुण्यात पूरस्थिती निर्माण झाली असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीसाठी गेल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तिकीट वाटपाला उशीर झाला तरी चालेल पण आधी पुण्यातली परिस्थिती हाताळा, असे म्हणत छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली.

सरकारला परिस्थितीचे गांभीर्य नाही. आधी सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्यावेळीही सत्ताधारी तिथे गेले नाही. आता पुण्यात पूर आला आहे. तर मुख्यमंत्री आणि पालकमंत्री तिकीट वाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीत गेले आहेत. तिकीट वाटपाची चर्चा दोन दिवसांनी झाली तर काहीही बिघडणार नाही, असे त्यांनी सांगितले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता, त्यावेळी मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेत व्यग्र होते. आता पुण्यात पूर आला आहे. त्यावेळी पालकमंत्री दिल्लीत आहेत. सत्ताधाऱ्यांसाठी जनता नाही तर सत्ता सर्वोच आहे. हे केवळ अधिकाऱ्यांना सूचना देण्याचे काम करताहेत, असे त्यांनी म्हटले आहे.