आंदोलन शांततेच्या मार्गाने करा, कोणाच्या नावाने शिमगा करू नका : पाटील

202

कोल्हापूर :  महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. मागासवर्ग आयोगाकडून अहवाल आल्यानंतर १५ ते ३० नोव्हेंबर या पंधरा दिवसांत सर्व घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करून मराठासमाजाला आरक्षण दिले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यातील मराठा आंदोलकांना विनंती आहे, की सरकारवर विश्वास ठेवून शांततेच्या मार्गाने आंदोलन करा, कोणाच्या नावाने शिमगा करू नका, असा टोला पाटील यांनी लगावला आहे .

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाराणी ताराबाई सभागृहात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे आयोजित युवा माहिती दूत उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वीही मराठा आंदोलनाबद्दल असेच वादग्रस्त विधान केल्याने सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. काही पेड लोकं आंदोलनात घुसले असून आंदोलन करून गाड्या फोडून काय साध्य होणार आहे? असा सवाल महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी याआधी उपस्थित केला होता. मराठा आरक्षणाचा निर्णय हा आता न्यायालयाच्या हातात आहे. त्यामुळे मंत्र्यांच्या गाड्या फोडून आरक्षण मिळेल का ? असा देखील पाटील यांनी म्हटलं होतं.