“त्या’ 12 जणांसाठी ठरली काळरात्र!

129

पुणे – अतिवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये शहरात सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अरण्येश्‍वरमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांसह खेड शिवापूर दर्गा परिसरात झोपलेले पाच जण पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

रोहित भारत आमले (वय 14), जान्हवी जगन्नाथ सदावरे (वय 35), श्रीतेज जगन्नाथ सदावर (वय 8), संतोष सहदेव कदम (वय 55), लक्ष्मी शंकर पवार (वय 69), ज्योत्स्ना राणे (वय 30, सर्व रा. सहकारनगर), मच्छिंद्र पांडुरंग वाबळे (वय 42), अमृता आनंद सुदामे (37), किशोर दत्तात्रय गिरमे (वय 54, तिघे रा. सिंहगडरोड), नागराज बाळकृष्ण भिल (वय 22), सुमन आदिनाथ शिंदे (वय 66, दोघे रा. भारती विद्यापीठ), वंदना विकास अतितकर (वय 55, दत्तवाडी) अशी मृतांची नावे आहेत.

बुधवारी मध्यरात्री अरण्येश्‍वर परिसरातील टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्याल्यामुळे स्थानिक नागरिक गंगातीर्थ सोसायटीजवळ थांबले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे सोसायटीची भिंत कोसळून पाच जण ठार झाले. तर काही नागरिक पाण्यात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.

पुरंदरमध्ये चौघे गेले वाहून
पुरंदर तालुक्‍यातील भिवडी येथे रात्रीच्या सुमारास पावसात घरातून बाहेर पडत असताना गजराबाई सुदाम खोमणे (वय 65) आणि छकुली अनंता खोमणे (वय 19) या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. त्याचप्रमाणे याच वेळी नारायणपूरकडून सासवडकडे दुचाकीवर निघालेल्या दोन व्यक्ती (यामध्ये एक पुरुष आणि एक महिला) भिवडी गावाजवळ पुराच्या पाण्यात दुचाकीसह वाहून गेले. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने शोध कार्य सुरू असताना यातील गजराबाई खोमणे यांचा मृतदेह घरापासून 200 ते 300 मीटर अंतरावर सापडला. तर पुणे येथून एनडीआरएफचे पथक सासवड येथे आल्यानंतर त्यांनी बेपत्ता व्यक्‍तींच्या शोधकार्याची मोहीम सुरू केली. रात्री उशिरापर्यंत कोणाचाही मृतदेह हाती लागला नसल्याने शोधकार्य अद्याप सुरूच आहे.