पुण्यात पावसाचा हाहाकार : दुर्घटनेत 12 जण ठार

154

पुणे – स्थानिक वातावरणातील बदल आणि बंगालच्या उपसागरात द्रोणीय स्थिती निर्माण झाल्याने शहरासह जिल्हात बुधवारी(दि. 25) रात्री पावसाने अक्षरश: थैमान घातले. त्यामुळे झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये अरण्येश्‍वरमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांसह खेड शिवापूर दर्गा परिसरात झोपलेल्या पाच जण पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक दुचाकी, चारचाक्‍या गाड्या वाहून गेल्या आहेत. अवघ्या दोन दिवसात 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ऑक्‍टोबर 2011 मध्ये एकाच दिवसात झालेल्या पावसानंतरच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे.

शहरात ढगफुटी सदृश्‍य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ओढ्यासह नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे सखल भागातील शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे संसार पाण्यात वाहून गेले आहेत. तर 150 घरांचे नुकसान झाले आहे. बुधवारी मध्यरात्री अरण्येश्‍वर परिसरातील टांगेवाला कॉलनीत पाणी शिरल्याल्यामुळे स्थानिक नागरिक गंगातीर्थ सोसायटीजवळ थांबले होते. त्यावेळी पाण्याच्या प्रवाहामुळे सोसायटीची भिंत कोसळून पाच जण ठार झाले.

तर काही नागरिक पाण्यात वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. पावसाच्या रुद्रावतारामुळे कात्रज, कोंढवा, वानवडी, इंद्रायणीनगर, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी, आंबिल ओढा कॉलनी, कोथरुड, पदमावती, मित्रमंत्रळ कॉलनी, आंबेगाव बुद्रुक परिसर, धायरी फाटा, सातारा रस्ता, वारजे माळवाडी परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत.

कात्रज परिसरातील लेकटाउन सोसायटीजवळील पूल वाहून गेल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शहरभरातील रस्त्यांवर पाणी वाहिल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले असल्यामुळे वाहतूकीचा वेग मंदावला आहे. सातारा रस्ता, पद्मावती, धायरी परिसरात वाहतूक संथगतीने सुरू असून चिखल, दगडगोटे, रस्त्यांवरील खड्डे पडल्याने वाहतूककोंडीत अधिकच भर पडली आहे. पावसाच्या थैमानामुळे आंबिल ओढ्यातील पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर वाहिल्याने पुरसदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली होती.

तसेच अनेक ड्रेनेजवरुन पाणी वाहत असल्यामुळे रस्ते जलमय होउन खड्डेयुक्त झाले आहेत. दोन दिवसात झालेल्या सर्वाधिक पावसामुळे शहरात हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल रात्रभर शहराला पावसाने वेठीस धरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.