5 फूट पाणी असतानाही जाण्याचा अट्टहास नडला

176

पुणे – 5 फूट पाणी असताना आणि स्थानिक नागरिकांनी पुढे जाण्याला मज्जाव केला असतानाही अनेकांना केवळ स्वत:ची वाहने घेऊन जाण्याचा अट्टहास नडला. त्यामुळे त्यातील काहीजणांना जीव गमवावा लागला.

रस्ते तुंबले असतानाही हटकून गाडी पुढे घेऊन जाण्याचा अट्टहास अनेकांनी केला. दुचाकी वाहन अक्षरश: पूर्ण पाण्यात बुडून गेले असतानाही दामटवून पुढे नेले जात होते. त्यातून स्थानिकांनी मज्जाव केला तरी त्यांचे न ऐकता आणि गाडी तेथेच बाजूला लावण्याची “रिस्क’ घ्यायची नसल्याने तशीच अनेकजण पुढे नेत होते. पाण्याला अत्यंत वेग असल्याने ओढ बसत होती. अनेकजण तोल जाऊन पडले आणि जखमीही झाले. मात्र, वाहन पुढे नेताना अनेकजण त्या पाण्याच्या लोंढ्याबरोबरच वाहून गेले. चारचाकी गाड्यांबाबतही तोच प्रकार घडला. गाडी सोडून न जाता गाडीतच बसून राहिल्याने आणि निम्मी गाडी पाण्यात बुडल्याने त्यांचे दरवाजे उघडलेच गेले नाहीत. त्यामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. “सर सलामत तो पगडी पचास’ असा विचार न करता केवळ आणि केवळ गाडीच्या हट्टाहासापाई काही जणांना हकनाक जीव गमवावा लागला ही वस्तुस्थिती दिसून आली.