अफगाणिस्तानात मतदान केंद्रावर बॉम्बस्फोट :15 गंभीर जखमी

199

नवी दिल्ली : अमेरिका आणि तालिबानमध्ये शांतता चर्चेला सुरुवात झाल्यानंतर अफगाणिस्तानात वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. देशाच्या नवीन राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी जवळपास 96 लाख मतदार सहभागी होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मतदानाच्या वेळी दक्षिण अफगाणिस्तानात मतदान केंद्रावर बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली आहे. ज्यामध्ये 15 लोक जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची धमकी तालिबान्यांनी यापुर्वीच दिली होती. असे असूनही, नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी लाखो लोकांनी मतदानास हजेरी लावली होती त्यातच आता हा स्फोट घडवून आणला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबान्यांशी चर्चा संपवण्याच्या घोषणेने अफगाणिस्तानात राजकीय अनिश्‍चितता निर्माण केली आहे. तालिबान्यांशी तडजोड, निवडणुका लांबणीवर टाकणे आणि राष्ट्रपती अशरफ घनी यांचे सत्तेतून बाहेर पडण्याची शक्‍यता पाहता ही मोहीम सुस्त होती. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानला ही निवडणूक पार पाडण्यात अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचेही सांगण्यात येत आहे