विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर पोलिसांना जाग

165

दामिनी पथकाचा अभाव : तळेगावात 12 रोमिओंना “हिसका’

तळेगाव दाभाडे – शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी रोडरोमिओंविरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर तळेगाव दाभाडे पोलिसांना जाग आली. त्यांनी मंगळवारी रोडरोमिओंवर कारवाई करीत तळेगाव दाभाडे परिसरातील 12 रोडरोमिओंवर सकाळी 9 ते दुपारी एकच्या सुमारास कारवाई केली. संदर्भात दैनिक प्रभातने मंगळवारी “छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनींची पोलीस ठाण्यात धाव’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची दखल घेत तळेगाव पोलिसांनी तळेगावातील काही शाळा, महाविद्यालयांबाहेर गस्त घातली. संशयास्पद रोमिओंवर कारवाई केली. पोलीस कारवाईच्या धसक्‍याने रोडरोमिओ गायब झाले. मात्र तळेगाव पोलिसांनी अद्यापही दामिनी पथक नियुक्‍ती केली नसल्याने महिला आणि विद्यार्थिनींना दामिनी पथकाच्या नियुक्‍तीची प्रतीक्षा लागली आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर बाजगिरे, कर्मचारी राजेंद्र बोरसे, बंडू तात्या मारणे, विकास तारू, सतीश मिसाळ,गणेश अंबावणे आदींनी साध्या वेशात आदर्श विद्या मंदिर व बालविकास विद्यालय परिसरात गस्त घातली. त्यावेळी संशयास्पद फिरणाऱ्या 12 रोडरोमिओंना ताब्यात घेऊन त्यांच्या दुचाकी जप्त केल्या. त्यांना दंडात्मक कारवाई करीत त्यांच्या पालकांना समज देण्यात आली. या कारवाईने रोडरोमिओंनी गायब झाले. महिला व विद्यार्थिनींनी पोलिसांचे आभार व्यक्‍त केले. पण कायमस्वरूपी दामिनी पथक नियुक्‍त करून त्यांचे मोबाईल क्रमांक शाळा व महाविद्यालयाच्या परिसरात लावण्याची मागणी केली.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा व महाविद्यालयात छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंच्या मुसक्‍या आवळणार आहे. महिला व विद्यार्थिनींनी रोमिओंबाबत माहिती पोलीस ठाण्याच्या देण्याचे आवाहन केले. लवकरच दामिनी पथकाच्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल क्रमांक शाळा व महाविद्यालय परिसरात ठळकपणे दर्शनी भागात लावण्यात येतील, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली.