लालमहाल कात टाकणार

158
  • सुशोभिकरणाला मंजुरी : ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण

पुणे : ऐतिहासिक लाल महालात मराठा शैलीमध्ये सुशोभीकरण आणि विविध विकासकामे करण्याला स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. प्लॅस्टर, रंगकाम, चांगल्या प्रतीचे टिकवूड आणि ऑरनामेंटल टिकवूडचा वापर, नेवासा बेसाल्ट, डेकोरेटिव्ह प्लॅस्टर, लाईम प्लॅस्टर, कौलारु डिझाईनचे छत, बाससन पॅनेल सीट, नेवासा बायसन पॅनेल सीट आदींच्या सहाय्याने ही विकासकामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी आर. पी. चित्रोडा यांच्या 75 लाख 54 हजार 700 रुपयांच्या निविदेला मान्यता देण्यात आली.

लालमहल या ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने सुशोभिकरण तसेच डागडूूजीचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. तो चार महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे पर्यटनास चालना मिळणार आहे. पुण्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक स्मारकांमध्ये लाल महालचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शहाजीराजे भोसले यांनी 1630 मध्ये त्यांची पत्नी जिजाऊ आणि मुलगा शिवाजी महाराज यांच्यासाठी हा महाल बांधला होता. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. बालपणी त्यांचे वास्तव्य लालमहलात होते. 1646 मध्ये मुघल साम्राज्याकडून तोरणा किल्ला जिंकून घेईपर्यंत महाराजांचे याठिकाणी वास्तव्य होते. सईबाईंबरोबर त्यांचा विवाह याच महालात झाला. शिवाजी महाराजांची शायिस्तेखानाबरोबर याच महालात लढाई झाली. खिडकीतून पळून जाताना महाराजांनी शायिस्तेखानाची बोटे छाटली. ऐतिहासिक शनिवारवाड्याजवळ लालमहाल आहे. वर्तमान लालमहालाची निर्मिती पुणे महापालिकेने 1984 ते 1988 या कालावधीत पूर्ण केली. शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या प्रसंगांची तैलचित्रे याठिकाणी पाहायला मिळतात. जिजामातांच्या नावाने याठिकाणी उद्यानही विकसित करण्यात आले आहे.