सासर आणि माहेरला जोडणारा मुलगी हा दुवा – मुनिश्री पुलकसागर महाराज

238

पुणे : आई-वडिल होणे विशेषत: मुलीचे पालक असणे ही वाटते इतकी सोपी गोष्ट नाही. ती एक तपस्या असते. कारण मुली या दोन कुटुंबाना जोडणारे माध्यम असते. त्यांना दोन कुटुंबाना जोडायचे असते. त्यामुळेच आपल्या मुलींना चांगले संस्कार देणे ही तिच्या माता-पित्यांचे प्रमुख कर्तव्य असते. तुम्ही दिलेल्या चांगल्या संस्कारांमुळेच तुमच्या मुलीचे घर, तिचा संसार सुखी होतो. त्यामुळे मुलीच्या पालकांनी आपल्या मुलीवर कुटुंब तोडणारे नव्हे, तर कुटुंब जोडणारे संस्कार घडतील याबाबत दक्ष असले पाहिजे,” अशा शब्दांत डिगंबर जैन मुनिश्री प.पु.108 पुलकसागर महाराज यांनी मुलींवर चांगले संस्कार घडविण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

सकल जैन वर्षा योग समितीतर्फे मुनिश्रींच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ज्ञानगंगा महोत्सव या मुनिश्रींच्या प्रवचन कार्यक्रमास धर्मानुरागी रसिकलाल एम. धारिवाल नगरी, महालक्ष्मी लॉन्स येथे प्रारंभ झाला आहे. यावेळी ज्ञानगंगा महोत्सवात प्रवचनाचे तिसरे पुष्प गुंफतांना ‘बेटी का घर’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी समितीच्या अध्यक्षा शोभा धारिवाल, कार्याध्यक्ष मिलिंद फडे, आर. एम फाऊंडेशनच्या जानवी धारिवाल, उपाध्यक्ष अजित पाटील, चकोर गांधी, सुजाता शहा, सचिव जितेंद्र शहा हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलाने झाली. पूर्वा शहा डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी मंगलाचरण सादर केले. स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष मिलिंद फडे यांनी केले.

मुनिश्री म्हणाले, घरात आनंद पैशांनी नाही येत. चांगल्या स्वभावाने, चांगल्या आचरणाद्वारे येते. दोन कुटुंबाना जोडणार्याय मुलींचे आचरण चांगले असेल, त्यांचा स्वभाव मधूर असेल. आपल्या कुटुंबियांची मनापासून सेवा करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये असेल तर नक्कीच त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून चांगली वागणूक मिळेल. तिच्या घरच्यांकडून, समजातील नागरिकांकडून तिला आदराची वागणूक मिळेल. त्यामुळेच मुलींवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. मुलींना असे संस्कार दिले पाहिजे की समोर येईल त्या प्रत्येक परिस्थीतीशी ती सामना करू शकेल, स्वत:पेक्षा वेगळ्या व्यक्तींशी जुळवून घेत त्यांना आपलेसे करण्याची क्षमता तिच्यामध्ये येईल. त्यामुळे मुलींचे व्यक्तीमत्व सर्वगुणसंपन्न बनेल याची काळजी तिच्या पालकांनी घेतली पाहिजे.”

अनेकदा मुलींना त्या काय करतात? कोणते कपडे घालतात? कोठे जातात? याबाबत नेहमी पालकांकडून विचारणा होत असते. मुलींना बरेचदा ही विचारणा म्हणजे बंधन वाटत असते. मात्र आई-वडिलांची विचारणा ही बंधन नसून ती त्यांची तुमच्याप्रती असणारी काळजी असते. आपली मुलगी सुरक्षित असावी हीच भावना त्या विचारण्यामागे असते. ही बाब मुलींनी लक्षात घेतली पाहिजे, असेही मुनिश्री यांनी सांगितले.