चाकणला गणेशोत्सव काळात झेंडूसह अष्टर खातोय भाव

235

फुले तोडणी अंतिम टप्प्यात

चाकण : गणेशोत्सव काळात झेंडु, अष्टर आदि फुलांना चांगला भाव मिळू लागल्याने ही फुले चांगलाच भाव खाऊ लागली आहेत. चाकण परिसरात सध्या झेंडू, अष्टर, सदाफुली ही फुले तोडण्याची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी या फुल शेतीकडे जास्त लक्ष केंद्रित केले आहे.

झेंडू सारख्या फुलांना गणेशोत्सव काळात समाधानकारक व योग्य भाव मिळत असतो. मात्र, गेल्या महिन्यात या परिसरात पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून उत्पादनात घट होण्याची शक्यता भोसे ( ता. खेड ) येथील फुल उत्पादक शेतकरी वसंतराव सोनबा लोणारी यांनी वर्तविली आहे. गेल्या पंधरा ते वीस वर्षात एवढा पाऊस झाला नाही. एवढा पाऊस यावर्षी पडला. पावसाने जमिनींना भेगा पडल्या. मागील महिन्यात जोरदार पाऊस कोसळल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भोसे, काळुस, वडगांव घेणंद, शेलगाव, आदी भागात दमदार पाऊस झाल्याने इतर पिकांसह फुलशेतीचे नुकसान झाले. गणेशोत्सव काळात या फुलाला चांगल्या प्रतीचा भाव मिळेल, या आशेने परिसरातील शेतकरी फुलांचे उत्पादन घेतात. यामध्ये अष्टर, झेंडू या फुलांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्यामुळे गणपती उत्सवात या फुलांना भरपूर मागणी असते. मात्र, अतिवृष्टीमुळे पिकांचे व फुलशेतीचे मोठे नुकसान झाल्यामुळे कमी प्रमाणात फुलांचे उत्पादन हाती आले असल्याचे वसंतराव लोणारी यांनी सांगितले.

फुलशेतीचे उत्पन्न घटल्याने बाजारात फुलांची आवक कमी प्रमाणात होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मुंबई, पुणे, चाकण येथील बाजारात विक्रीसाठी फुले नेण्याच्या दृष्टीने शेतकरी नियोजन करताना दिसून येत आहेत. फुलांचे व्यापारी अगदी शेतकऱ्यांच्या शेतात येऊन फुलांची मागणी करीत आहेत. सध्या फुलांना चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. अष्टर या फुलांसाठी शेकडा ७० ते ९० रुपये जुडीकरिता व डाखळी अष्टर फुलांसाठी सत्तर ते शंभर रुपये असा उच्चांकी भाव मिलु लागला आहे. झेंडू या फूलांसाठी ७० ते १०० रुपये प्रती किलो बाजारभाव मिळत असल्याचे या भागातील शेतकरी सांगत आहेत.