पाऊसगाणी, कवितांनी श्रोते ओलेचिंब

312

साहित्यानंद प्रतिष्ठानतर्फे ‘प्रेमात पडलेला पाऊस’वर रंगली काव्यमैफल

पुणे : भेटू पुन्हा म्हणाली पाऊस थांबल्यावर… आला वयात पाऊस… क्षितिजावर पसरत जाती ढग निळे सावळे काळे… आला गार गार वारा लडिवाळ झोंबणारा… घन घन माला नभी दाटल्या… भेट तुझी माझी स्मरते… चिंब भिजलेले रूप सजलेले… असा बेभान हा वारा… अशा पावसावरील लोकप्रिय काव्य-गीतांनी रसिकांच्या मनावर बरसात केली. स्वर-शब्दांच्या या बरसातीने उपस्थित ओलेचिंब होऊन गेले. निमंत्रित कवींच्या पाऊसकविता आणि विजय वडवेराव-स्मिता भद्रिगे यांचे गायन यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.

निमित्त होते, साहित्यानंद प्रतिष्ठान आयोजित ‘प्रेमात पडलेला पाऊस’ या साहित्य व संगीताच्या चिंब आविष्काराचे. पावसावर आधारित कवितांची मैफल आणि जोडीला मनाला चिंब भिजवणारी पाऊसगाणी. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात रंगलेल्या या निमंत्रित कवींच्या काव्यमय मैफलीला ज्येष्ठ गजलकार म. भा. चव्हाण, कवियत्री प्रा. कल्पना सोमनाचे, शास्त्रीय गायक शिवाजी चामनार यांची उपस्थिती होती.  प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय वडवेराव, सचिव दत्ता हगवणे, कार्याध्यक्ष बाळासाहेब घस्ते उपस्थित होते.

‘भेटू पुन्हा म्हणाली पाऊस थांबल्यावर, ओलावतील तळवे पाऊस सांडल्यावर’, ‘क्षितिजावर पसरत जाती ढग निळे सावळे काळे, अन् क्षणात विणले जाते पाऊस सरींचे जाळे’, ‘असे भरुनी आभाळ यावे, ढग पाण्याचा तडकावा, पाण्याचा तो शुभ्र पितांबर, धरणीवरती बरसावा’ अशा कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. तीन तास रंगलेल्या या काव्य मैफिलीत पावसाच्या आगमनाची आतुरता काव्यप्रतिभेतून व्यक्त झाली. संजय बोरुडे, संदीप वाघोले, प्राजक्ता पटवर्धन, नेहा चौधरी, वैभव धस, भाग्यश्री कुलकर्णी, दत्ता हगवणे, दत्तू ठोकळे, विवेक कुलकर्णी आदी कवींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि निवेदन कविता मोरवणकर यांनी केले.

म. भा. चव्हाण म्हणाले, “पाऊस हा कवीचा आवडता विषय आहे. पावसावरच्या कविता त्याच्या थेंबाप्रमाणे हळुवार गारवा देणाऱ्या असतात. प्रत्येक थेंबावर, सरीवर, त्याच्या आगमनावर आणि त्याच्या विरहावरही काव्यरचना होऊ शकतात. अशा पावसावर काव्य मैफल भरविण्याचा साहित्यानंद प्रतिष्ठानचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.”