राज ठाकरे यांनी पक्षवाढीवर लक्ष केंद्रीत करावे : रामदास आठवले

267

रिपब्लिकन पक्षाला दहा जागा देण्याची मागणी

पुणे : “ईव्हीएम मशीन कॉंग्रेसच्या काळातच आले आहे. मशीनममळे भाजपला फायदा झाला म्हणणे चुकीचे आहे. राज ठाकरे यांना सध्या काही उद्योग नाही आणि विरोधक गलितगात्र झालेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्यावरून देश फिरण्यापेक्षा महाराष्ट्रात राहून पक्षवाढीवर लक्ष केंद्रीत करावे,” असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला पिंपरी आणि कॅंटोनमेंटसह दहा जागा द्याव्यात, अशी मागणीही आठवले यांनी केली.

नवीन विश्रामगृहात झालेल्या या पत्रकार परिषदेवेळी महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, पुण्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष अशोक कांबळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत साठे, अल्पसंख्याक आघाडीचे अॅड. आयुब शेख, शहर कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे आदी उपस्थित होते.

रामदास आठवले म्हणाले, “नरेंद्र मोदी जातीधर्माच्या पलिकडे जाऊन राजकारण करत आहेत. त्यांच्या विकासाच्या राजकारणामुळे देशातील जनता त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे २०२४ लाही आमचेच सरकार येईल. विधानसभेसाठी युती कायम राहावी, यासाठी माझा प्रयत्न आहे. वंचित आघाडीचा फायदा भाजपला होत नाही. काही जागांवर त्यांना मताधिक्य मिळाले असले, तरी आता त्यांच्यात फूट पडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांची भीती नाही.”

“लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी राजीनामा द्यायला नको होता. खंबीरपणे उभे राहून पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता. तिहेरी तलाकवरुन कॉंग्रेसने घेतलेली भूमिका योग्य नाही. ईव्हीएम मशीन कॉंग्रेसनेच आणले. आज मात्र ते विरोध करत असून, बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करत आहेत. बॅलेट पेपरवर निवडणूक घेतली, तरी आम्हीच जिंकून येऊ,” असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

रामदास आठवले पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस हे अतिशय चांगले मुख्यमंत्री आहेत. पुढेही तेच राहतील. माझे त्यांच्याशी चांगले संबंध असल्याने कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रिपब्लिकन पक्षाला एक कॅबिनेट एक राज्यमंत्री पद, तसेच ४-५ महामंडळ मिळावीत. अॅट्रोसिटी कायदा ब्राह्मण समाजाला लागू नाही. पण त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.”

अशोक कांबळे यांनी प्रास्ताविक केले. महिपाल वाघमारे यांनी आभार मानले.