भाजपा प्रवेश देणे आहे, पुण्यात पोस्टरच्या माध्यमातून टोलेबाजी

289

भाजपा आणि शिवसेना पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरु आहे. राष्ट्रवादी नेते सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षात केलेल्या प्रवेशामुळे सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला असताना आता नवी मुंबईत राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. गणेश नाईक भाजपात जाणार की नाही? हा निर्णय होणे अद्याप बाकी आहे. तसंच शिवेंद्रसिंहराजे भोसले हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. दरम्यान यावरुन पुण्यात पोस्टर लावत टोलेबाजी करण्यात आली आहे.

अनोळखी व्यक्तीकडून हे पोस्टर लावण्यात आले असून नोकरीची जाहिरात असल्याप्रमाणे भाजपा प्रवेश देणे आहे असा उल्लेख या पोस्टरवर करण्यात आला आहे. इतकंच नाही तर यासोबत नियम व अटीही देण्यात आल्या आहेत. ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती आणि सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव अशा प्रमुख अटी असल्याची खिल्ली पोस्टरमध्ये उडवण्यात आली आहे.

या पोस्टरमध्ये तळटीपही देण्यात आली आहे. विचारधारेची कुठलीही अट नाही असं सांगताना आमच्याकडी जागा फुल झाल्यास मित्रशाखेत अॅडजस्ट करता येईल असा टोला लगावण्यात आला आहे. कारण भाजपासोबत शिवसेनेतही काही नेत्यांनी प्रवेश केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना फोडण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआय या संस्थांचा वापर केला जात आहे. राज्यातील भाजपाच्या काही प्रमुख नेत्यांनी या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले असून, राष्ट्रवादीच्या नेत्यांना धमकावून त्यांना पक्षांतर करण्यास भाग पाडण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे रविवारी केला. शिवेंद्रराजे, संग्राम जगताप, दिलीप सोपल यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असली तरी ते पक्ष सोडणार नाहीत, असेही पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या आरोपाला उत्तर देताना दबाव टाकून लोकं घेण्याची भाजपला गरज नाही असं सांगत शरद पवारांनी आत्मचिंतन करावं असं म्हटलं होतं. भाजपात येण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक स्वत: इच्छूक आहेत. त्यांना फोन करण्याची आणि दबाव टाकून घेण्याची भाजपाला काहीच गरज नाही. मोजक्या नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.