शिक्षणाबरोबरच कला आत्मसात केली पाहिजे : डॉ. नंदकिशोर कपोते

223

तान्हुराम कल्याणकारी संस्थेच्या वतीने पुरस्कार वितरण

पुणे : “शिक्षणाबरोबर नृत्य, गायन, वादन आदी कला शिकणे आवश्यक आहे. शास्त्रीय नृत्य प्रकार आज शिक्षणामध्ये समाविष्ट केले आहेत. यावरून आपल्याला कला किती महत्त्वाचे आहे, हे जाणवते. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्यात शिक्षणाबरोबरच एखादी तरी कला आत्मसात करायला हवी,” असे प्रतिपादन अखिल भारतीय कथ्थक तज्ज्ञ डॉ. नंदकिशोर कपोते यांनी केले.

तान्हुराम कल्याणकारी संस्थेच्या वतीने आयोजित पेरीयार ई. व्ही. रामास्वामी नायकन (दक्षिणेचे ज्योतिबा फुले) सामाजिक पुरस्कार व कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. कपोते बोलत होते. सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या या सोहळ्यावेळी सर्वोच्च न्यायालयातील वकील ऍड. आशुतोष रानडे, प्रसिद्ध वक्ते आणि महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळाचे सचिव डॉ. विकास आबनावे, माजी सिनेट सदस्य डी. जी. कांबळे, संस्थेचे सचिव म्हस्कू अडागळे, संचालक अॅड. वैशाली भोसले, नितीन भोसले आदी उपस्थित होते.

डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले, “अलीकडे विद्यार्थ्यांना कोणताही कला प्रकार शिकला, तर परीक्षेत त्याचे १५ ते २० गुण दिले जात आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी कलेकडे वळत असून, भरतनाट्यम, कथक शिकत आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर कला जोपासल्यामुळे त्याचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळे कलेला महत्व देणे गरजेचे आहे. पेरियार रामास्वामी आणि भाऊराव पाटील यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”

डॉ. विकास आबनावे म्हणाले, “रामास्वामी नायकन यांनी दक्षिणेतील अनिष्ट प्रथांविरोधात लढा उभारला. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने तरुणांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा मिळेल. भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात उभारलेले काम अतुलनीय आहे. काम करुन शिका, असा संदेश देत कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाज घडविला. त्यांनी मूलभूत शिक्षण देऊन समाजाला शहाणे केले. आज मात्र शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे, हे दुर्दैव आहे. पेरीयार रामास्वामी आणि भाऊराव पाटील दोघेही शापित गंधर्व होते.”

अॅड. आशुतोष रानडे म्हणाले, “शिक्षणाबरोबर काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना कष्टाची जाणीव होते, तसेच अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी इतर गोष्टीचाही आनंद घेतला पाहिजे. नाट्य, चित्रपट किंवा छंद, आवडीनिवडी अश्या गोष्टीही जपल्या पाहिजेत. अभ्यास एक अभ्यास अशा गोष्टी न करता इतर गोष्टींनाही आयुष्यात महत्त्व देणे गरजेचे आहे. कमवा आणि शिका हाच खरा आयुष्य घडविण्याचा मार्ग आहे.”

सामाजिक, कृषी, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या मान्यवरांचा सन्मान या दोन्ही पुरस्कारांनी करण्यात आला. वैशाली भोसले यांनी प्रास्ताविक केले. भैरवनाथ कानडे यांनी सूत्रसंचालन केले. नितीन भोसले यांनी आभार मानले.