तुपेंच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी तांबे, धनकवडे आणि बराटेंची फिल्डींग

181

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांच्याकडे सोपविल्याने त्यांच्या विरोधी पक्षनेते पदावर कोणाला बसविणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

या पदाच्या निमित्ताने हडपसर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय गणितांची जुळवाजुळव राष्ट्रवादीकडून केली जाण्याचा अंदाज आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीकडे डोळा ठेवून असलेले माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, विशाल तांबे, दिलीप बराटे, यापैकी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता आहे.

खडकवासल्यातील विधानसभेसाठीच्या उमेदवारीसाठी पक्षातील स्पर्धा कमी करण्यासाठी तेथील एखाद्या इच्छुकाचे महापालिकेत पुनर्वसन केले होऊ शकते. ज्यामुळे लोकसभा निवडणुकीत फायदा होईल, अशी आशा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. मात्र, या बदलांमध्ये तुपे कुठे दुखावले जाणार नाहीत, याचीही काळजी घेण्याचा नेत्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. हराध्यक्ष निवडीनंतरही काही महिने तुपे यांच्याकडेच विरोधी नेतेपदाची जबाबदारी कायम राहू शकते.

शहराध्यक्ष झाल्याने तुपेंना आठही विधानसभा मतदारसंघात लक्ष घालावे लागेल. या काळात नेत्यांच्या सभा आणि त्यांच्या कार्यक्रमांचे नियोजन त्यांच्याकडे राहील. त्यामुळे तुपे यांच्याकडील विरोधीपक्ष नेतेपद अन्य मंडळींकडे द्यावी, अशी पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांची इच्छा आहे. अशा नावांतच धनकवडे, तांबे आणि बराटे यांचा समावेश आहे.
विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीवरून वाद वाढविण्याऐवजी तुपेंना कायम ठेवण्याचाही पर्याय निघू शकतो. दुसरीकडे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप आणि प्रशांत जगतापांकडेही संघटनेतील महत्त्वाची जबाबदारी येण्याचा अंदाज आहे.