अजितदादा… माझे बोलणे फार मनाला लावून घेऊ नका : राज ठाकरे

256

ठाणे : अभिनेता आमीर खान यांच्या पानी फाऊंडेशनच्या रविवारी झालेल्या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली होती. त्यातून उडालेल्या शाब्दिक फटकाऱ्यांचे पडसाद गेले दोन दिवस उमटत आहेत. हा वाद शांत करण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी आज केला.

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील जलसिंचनाविषयी प्रश्न उपस्थत केला होता. हा सिंचनाचा पैसा मुरला नसता तर राज्याचे चित्र वेगळे असते, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मारला होता. यावर पवार यांनी काहीजणांना काहीच करायचं नसतं. केवळ बोलघेवडे असतात, अशी टीका राज यांच्यावर केली होती. या टिकेनंतर राज यांनी यावर स्पष्टीकरण देण्याचा आज प्रयत्न केला.

अजित पवारांनी माझं म्हणणं इतकं का मनावर घेतलं, असा सवाल उपस्थित केला. राज ठाकरे म्हणाले की मी जे बोललो ते 1960 पासून सुरू आहे, त्यावर फक्त भाष्य केले होते. अजित पवारांनी मनाला का लावून घेतलं, हे मला माहिती नाही. पण, मनाला लावून घेऊ नका असं सांगत त्यांनी अजित पवारांची समजूत  काढण्याचा प्रयत्न केला आहे
आज (ता.14) राज ठाकरे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.  या पत्रकार परिषदेदरम्यान, ठाण्याला आता अत्यंत प्रामाणिक पोलिस आयुक्त मिळाल्याने ठाण्याचे आता चांगले होणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

पानी फाऊंडेशनच्या कार्यक्रमानंतर मनसे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस या दोन्ही पक्षांतील नेत्यांत वाद सुरू झाला होता. टिव्हीवरील चर्चेत या पक्षाचे प्रवक्ते आक्रमक झाले होते. मनसेने सिंचनाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी टोलच्या झोलचा मु्द्दा टीव्हिवरील चर्चेत मांडला होता.