सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ साजरा

253

पुणे : “देशभक्ती दाखवण्यासाठी सैन्यात जाणे आवश्यक नाही, तर तुम्ही एक चांगले नागरिक म्हणून समाजात वावरा. ज्या क्षेत्रात कार्य करत आहात, त्यातून देशाच्या प्रगतीला आपला हातभार लागेल, यासाठी प्रयत्न करा.  तीही एक प्रकारे देशसेवाच होईल. सैनिक सीमेवर देशाचे संरक्षण करतील आणि आपण देशहिताचे, मूल्यसंवर्धनाचे काम करून देशभक्ती जागवूया,” असे प्रतिपादन राष्ट्रपतीपदक प्राप्त ग्रुप कॅप्टन (निवृत्त) अश्वनी भाकू यांनी केले. सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या बावधन कॅम्पसमध्ये ‘कारगिल विजय दिवस’ साजरा करण्यात आला. त्यावेळी भाकू बोलत होते.

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत व्हावी आणि देशाविषयी प्रेम निर्माण व्हावे, यासाठी सूर्यदत्ता संस्थेकडून विविध उपक्रम राबविले जातात. २६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवत कारगिल जिंकले. त्यानिमित्ताने २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. भारतीय सैन्याला मानवंदना देण्यासाठी विदयार्थ्यांनी सैनिकांचा पोशाख परिधान करून ‘कंधे से मिलते हैं कंधे’ या गाण्यावर नृत्य सादर केले आणि उपस्थितांचे मने जिंकली. डॉ. संजय चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली प्रगती करत असलेल्या सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटकडून युद्धात वीरमरण आलेल्या ५२७ बहादुर जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अश्वनी भाकू यांनी कारगिल युद्धामधील त्यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी कारगिल युद्धातील थरारक अनुभव सांगत कॅप्टन सौरभ कलिया, कॅप्टन अनुज नायर, ग्रेनेडीयर योगेंद्र सिंह यादव, लेफ़्टनंट मनोज पांडे आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांच्यासारख्या शूरवीरांच्या आठवणी सांगताना प्रेक्षागृहात उपस्थितांचे डोळे पाणावले.

डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “देशभक्ती आपल्या आयुष्याचा एक भाग असावी. संरक्षण दल आणि पोलिस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती सूर्यदत्ता ग्रुपमध्ये येऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजण्याबरोबरच त्यांच्या कार्याची ओळख होते. ऑल इंडिया अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष एम.एस. बिट्टा यांनी अनेकदा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. सैनिकांच्या कुटुंबीयांप्रती आदरभाव व्यक्त करण्याबरोबरच त्यांच्यासाठी आम्ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अनेक उपक्रम राबवतो. वीरनारी आणि वीरांना सन्मानित करण्यासह सैनिकांच्या पाल्यास शिष्यवृत्ती योजना आम्ही राबवित असतो.”