येत्या 24 तासांत मुंबईत अतिवृष्टी, राज्यात ‘अशी’ आहे पावसाची स्थिती

259

मुंबई, 09 जुलै : आज म्हणजेच मंगळवारी मुंबईवर अस्मानी संकट येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी मुंबईकरासाठी हाय अलर्ट जारी केला आहे. 200 मिली पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. आज ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासांत बरसणारा हा पाऊस जोरदार आहे. त्यामुळे अतिमुसळधार पावसामुळे पोलिसांनी मुंबईकरांना शक्य असेल तरच घराबाहेर पडा अशा सुचना केल्या आहेत.

मुंबई आणि पुण्याला जोडणारा सायन-पनवेल हा महामार्ग काल अक्षरश पाण्याखाली गेला होता. खारघर येथील पांडवकडा धबधब्याचा ओढा फुटल्यानं सायन-पनवेल महामार्गाला नदीचं स्वरुप आलं. आठवड्याभरात सलग दुसऱ्यांदा पाण्यानं नागरिकांची वाट अडवल्यानं प्रशासनाचं पितळ उघडं पडलं आहे.

सोमवारी झालेल्या पावासामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये खूप पाणी साचलं होतं. रेल्वे स्थानकांत पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे धिम्यागतीने सुरू होती. आजही मुंबईत पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडताना तुमच्या शहरातील पावसाचा अंदाज

वाशिम जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुका असलेल्या रिसोडमध्ये काल सायंकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली.

या पावसामुळे अंकुरलेल्या पिकाला आधार मिळणार असून पिण्याच्या पाण्याचीही समस्या निकाली निघायला मदत होईल. या अगोदर पडलेल्या अत्यल्प पावसामुळे खरिपाच्या पिकाला दमदार पावसाची गरज होती.

मृग लागल्यापासून एक महिना उलटला तरी हिंगोली जिल्ह्याला पावसानं हुलकावणी दिली होती. योग्य पाऊस न झाल्याने जिल्ह्यात पेरणीचे प्रमाण कमी होते. मात्र, काल संध्याकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने दमदार आगमन केलं. जिल्ह्यातील हिंगोली, औंढा, नागनाथ, वसमत, कलमनुरि, सेनगाव सर्व तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे रस्ते-गटारं वाहू लागली आहेत. या पावसामुळे पेरणीला वेग येईल तर शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात 120 मिलीमिटर पावसाची नोंद पर्जन्यमापन यंञावर करण्यात आली आहे. तर ठिकठिकाणी रस्त्यावर झाडं उन्मळून पडली आहेत. तर आरळा शित्तुर जाणाऱ्या मार्गावर वडाचे झाड कोसळून दोन महीला गंभीर जखमी झाल्या आहेत. सततच्या पावसाने सांगली कृष्णा नदीमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होते आहे.

जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-ओझर रस्त्यावर कुकडी नदीवरच्या पुलाला मोठा खड्डा पडला असून पुलाच्या स्लॅबचेही नुकसान झाले आहे. यासोबत कठडेही तुटले असून अष्टविनायक गणपतीला दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या जीविताला यामुळे मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पुलावरून रोज मोठ्या प्रमाणात महाविद्यालयातील विद्यार्थी, कारखान्याच्या ऊसाच्या गाड्या, माल वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते असते. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

रायगड जिल्ह्य़ात रात्रभर पाऊस सुरू आहे. अलिबाग मुरुड पेण तालुक्यातही मोठ्या प्रमाणात पाऊस  होतो आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कुंडलिका नदी धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिक जिल्ह्यात 24 तासात 726 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळं पंचवटी परिसरात जुन्या इमारतीचा पुढचा भाग कोसळला. हेमकुंज परिसरातील हर्षवर्धन सोसायटीचा पुढचा भाग कोसळला आहे. दोन दिवसांपूर्वीच इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरीत केल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

इगतपुरीला धुक्यानं वेढलं आहे. कसारा घाटात प्रचंड धुकं पसरलं असून पाऊस आणि धुक्यामुळं वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे. भरदिवसा हेडलाईट लावून वाहनं घाटातून धावताना दिसताहेत. मागील 24 तासात 63 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

लोणावळा, खंडाळ्यासह मावळात सर्वत्र आठवडाभरापासून मुसळधार पाऊस आहे. त्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक नद्या, ओढे आणि नाल्यांना पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.

नाशिकच्या गोदावरीला आलेला पूर ओसरला आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला आणि रात्रीतून गोदावरीची पाणी पातळीही घटली आहे. शहरातील रस्ते, नाल्यांचं पाणी गोदा पत्रात जमा झाले होते. त्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण 36 बंधारे पाण्याखाली गेलेत असून नदीचं पाणीही पात्राबाहेर आलं आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड आणि माणगाव तालुक्यात आज जोरदार पावसानंतर पुरसदृष्य परीस्थिती निर्माण झाली आहे. सावित्री आणि काळ या दोन नद्या दुथडी भरून वाहत असून माणगाव तालुक्यातील इंदापुरनजिक असलेल्या वाढवण, पाणचई, जवाटे, भाले या चार गावचा संपर्क तुटला आहे. तर महाड शहरामधील क्रांतीस्थंभ या परिसरात गांधारी नदीचे पाणी शिरले आहे.

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली गोदावरी नदी वाहती झाली आहे. दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. अनेक दिवसापासून गोदावरी नदीचे कोरडेठाक पडलेले पात्र पाण्याने भरभरून वाहत असल्याने नदिकाठची जनता सुखावली आहे.

मागील 3 ते 4 वर्षापासून दुष्काळात होरपळत असलेल्या परभणी जिल्ह्याला यावर्षी देखील पावसाने हुलकावणी दिली असून, आतापर्यंत केवळ 12 टक्केच पाऊस झाला आहे. जून महिन्यामध्ये जिल्ह्यात 126 मिलिमीटर सरासरी पाऊस होतो. परंतु यावेळी केवळ 78 मीमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पावसाची तूट कशी भरून निघणार या चिंतेमध्ये शेतकरी दिसू लागला.