ग्राहकांसोबत शरीरसंबंधास नकार देणाऱ्या बार डान्सरला सहकाऱ्यांकडून विवस्र करून मारहाण

236

हैदराबाद : हैदराबादमधील एका बारमध्ये महिला डान्सरसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पोलीस तक्रार झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे. ग्राहकांसोबत शरीरसंबंधास नकार दिल्याने महिला डान्सरच्या चार महिला सहकारी आणि एका व्यक्तीकडून ही मारहाण करण्यात आली.

पंजागुट्टा पोलिसांनी याप्रकरणी चार महिलांना अटक केली आहे. तर मारहाण करणारा पुरुष अद्याप फरार आहे. त्याचाही शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला डान्सरने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महिलेने काही महिन्यापूर्वीच सिकंदराबादमधील बेगमपेटमधील एका बारमध्ये काम करणे सुरु केलं होतं. काही दिवसांनंतर ग्राहकांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी तिच्या सहकाऱ्यांकडून तिच्यावर जबरदस्ती केली जाऊ लागली. मात्र तिने नकार दिल्याने त्यांनी तिला कपडे काढून मारहाण केली.

या प्रकरणाची दखल तेलंगणाचे पोलीस महासंचालक महेंद्र रेड्डी यांनीही घेतली आहे. पोलीस महासंचालकांनी याप्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवला आहे. या प्रकरणी चार महिलांना अटक करण्यात आली असून एक जण फरार आहे. आरोपींच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.