जातीच्या दाखल्या करिता जाचक अटी शिथिल करा : दीपक ताटे

183

चाकण : जातीच्या दाखल्या करिता पन्नास वर्षांच्या पुराव्याची जाचक अट शिथील करून वीस वर्षांचा पुरावा ग्राह्य धरण्यात यावा, अशी मागणी भापसे पार्टीचे अध्यक्ष दीपक ताटे यांनी केली आहे.

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामांसाठी अथवा अन्य कामांसाठी जातीचा दाखला आवश्यक करण्यात आला आहे. त्यामुळे हा मूळ दाखला मिळविण्यासाठी विद्यार्थी व त्यांचे पालक यांची कागदपत्रां अभावी मोठी ससेहोलपाट वाढली आहे. या दाखल्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमुळे पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. जातीचा दाखला काढण्यासाठी तब्बल पन्नास वर्षांचा पुरावा मागितला जात असल्याने गोरगरीब, दिनदलित, मागासवर्गीय, ओबीसी तसेच इतर सर्वच समाजातील विद्यार्थी अथवा युवकांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप दीपक ताटे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांना मिळणाऱ्या आरक्षण सवलती पासून त्यांना विनाकारण वंचित ठेवले जात आहे. तहसीलदार कार्यालयात यासाठी कागदपत्रांची पुर्तता करूनही संबंधित व्यक्ती जागेवर मिळेल, याची खात्री नसल्याने हेलपाटे मारण्यात वेळ जात असल्याने पालक व विद्यार्थी हतबल झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जातीच्या दाखला मिळण्याकरिता पन्नास वर्षांची जाचक अट शिथिल करून केवळ वीस वर्षांचाच पुरावा ग्राह्य धरावा, या मागणीवर दीपक ताटे ठाम आहेत.