राज ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणतात…

174

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी दोघांची भेट झाली. मनसे अध्यक्षांचे आभार मानण्यासाठी आल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी भेटीनंतर दिली.

खासदार अमोल कोल्हे यांनी आज सकाळीच राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. भेटीचा नेमका विषय काय होता, यावर तर्कवितर्क लढवले जात होते. परंतु भेटीनंतर स्वत: अमोल कोल्हे यांनीच भेटी काय घडल्याचं सांगितलं.

राज ठाकरेंना धन्यवाद म्हटलं : अमोल कोल्हे

“लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या सभांचा परिणाम झाला. त्यामुळे मी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर आलो होतो. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आमच्यात चर्चा झाली. विशेष म्हणजे या भेटीत राजकीय चर्चा मात्र झाली नाही,” असं डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव

दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिरुर मतदारसंघातशिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव केला. अमोल कोल्हेंनी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

शिरुर मतदारसंघातील एकूण 12 लाख 86 हजार 226 मतांपैकी अमोल कोल्हे यांना 6 लाख 34 हजार 108 मते (49.19 टक्के) मते मिळाली. शिवाजीराव आढळराव पाटील यांना 44.63 टक्के म्हणजे 5 लाख 75 हजार 279 मतं मिळाली. या मतदारसंघात 23 उमेदवार उभे होते. कोल्हेंनी 58 हजार 878 मतांनी आढळराव पाटलांचा पराभव केला.