अधिवक्ता पुनाळेकर यांची अटक रहित होईपर्यंत देशभर आंदोलन चालूच राहणार ! : समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना

150

पुणे : जनहितासाठी लढा देणारे प्रखर हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ८ महिन्यांपूर्वीच्या एका खोट्या आरोपाखाली अटक करून सीबीआयने सुड उगवला आहे. या अटकेमुळे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित लोकांनी या अन्याय्य अटकेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. फेसबुक, ट्वीटर, व्हॉटस्अ‍ॅप आणि यू-ट्यूब आदी सोशल मीडियावरही जनतेच्या तीव प्रतिक्रिया उमटत आहेत. देशभरात विविध ठिकाणी अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना निवेदने, तक्रारी करून, तसेच निदर्शने, धरणे आंदोलन यांद्वारे शासनाचे लक्ष वेधत आहे. सीबीआयने अधिवक्ता पुनाळेकर यांच्यावरील खोटे आरोप मागे घेत त्यांची तात्काळ सुटका करावी, अन्यथा ही सुटका होईपर्यंत देशभरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, तसेच अधिवक्ता यांचे आंदोलन चालूच राहील, अशी चेतावणी आज समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आलेली आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना (डावीकडून) प्रा. विठ्ठल जाधव, श्री. सुनील घनवट, श्री. विद्याधरपंत नारगोलकर, श्री. जयसिंह राजपुरोहित, डॉ. निलेश लोणकर, श्री. रोहित भट

या वेळी सर्व मान्यवरांनी ‘#ReleaseAdvSanjeevPunalekar’ या आशयाचे फलक हातात धरून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अन्याय्य अटकेचा निषेध व्यक्त केला.

पुणे येथील पत्रकार भवन, गांजवे चौक येथे ‘समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनां’द्वारे पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेला ‘पनून काश्मीर’चे पश्‍चिम भारत समन्वयक श्री. रोहित भट, सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे श्री. विद्याधरपंत नारगोलकर, अखिल राजस्थान समाज संघाचे श्री. जयसिंग राजपुरोहित, सावरकर युवा विचार मंचचे डॉ. नीलेश लोणकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रा. विठ्ठल जाधव उपस्थित होते.

या वेळी पनून काश्मीरचे श्री. रोहित भट म्हणाले की, काश्मिरी हिंदूंचा आवाज दाबण्यासाठी काश्मिरी हिंदूंच्या नेत्यांना एक-एक करून मारण्यात आले आहे. त्याप्रमाणे हिंदूंचा बुलंद आवाज दाबण्यासाठी अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना अटक करून दमनशक्तीचा प्रयोग केला जात आहे; पण हिंदू यापुढे दबणार नाहीत हे त्यांनी लक्षात घ्यावे. अधिवक्ता पुनाळेकर यांनी सीबीआयच्या अधिकार्‍यांविरुद्ध केलेल्या सर्व तक्रारींची सखोल आणि नि:पक्ष चौकशी व्हायला हवी.

श्री. जयसिंह राजपुरोहित यांनी सांगितले की, मागील काही वर्षांपासून हिंदूविरोधक आणि पुरोगामी यांच्याकडून हिंदूंना लक्ष केले जात आहे. त्याच्या दबावापुढे सीबीआय झुकली असली, तरी संपूर्ण राजस्थानी समाज आणि समाजातील सर्व संघटनांचा अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना पाठिंबा आणि समर्थन आहे.

त्यानंतर श्री. विद्याधर नारगोलकर म्हणाले की, प्रतिपक्षाच्या ज्येष्ठ अधिवक्त्याला थेट अटक करणे हा सीबीआयचा नैतिक पराभव आहे. दाभोलकर हत्या प्रकरणात खर्‍या आरोपींना सोडून निरपराध व्यक्तींना अटक करण्याचा सपाटा चालू आहे. ‘आम्ही काहीतरी करतोय’ हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न तपास यंत्रणांकडून चालू आहे.

समितीचे श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, पोलीस कोठडीत एका आरोपीला जबर मारहाण करून घेतलेल्या जबाबावरून अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ८ महिन्यांनंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर अटक करणे, हे एक मोठे षड्यंत्र आहे. हा हिंदुत्वाचा गळा घोटण्याचा प्रकार आहे. तसेच या अटकेमुळे हिंदू शांत बसतील या भ्रमात कोणी राहू नये. आता अधिवक्ता संघटित होऊन थेट सीबीआयच्या कार्यालयासमोर निदर्शने करत आहेत. बार कौन्सिलकडे तक्रारी करत आहेत. हिंदूंची शक्ती आता जागृत झाली असून तिचा प्रत्यय आल्याशिवाय रहाणार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.