रांगेचा वाद आता संपवा; शरद पवारांचं आवाहन

110

पुणे :  मोदींच्या शपथविधी सोहळ्यातील रांगेच्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘रांगेवरून निर्माण झालेल्या वादात कोणा एकाची चूक झाली असावी. ती माझ्या कार्यालयाची असेल किंवा त्यांच्या कार्यालयाची. पण तो विषय इतका मोठा नाही. तो आता संपायला हवा,’ असं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे.

नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधी सोहळ्यात पाचव्या रांगेतील पास देण्यात आल्यानं शरद पवार यांनी सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते. त्यावरून मोदी सरकारवर टीकाही झाली होती. मात्र, पवारांना अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या रांगेतच स्थान देण्यात आलं होतं. VVIP मधील V शब्दावरून त्यांच्या सचिवांचा गोंधळ झाला असावा, असा खुलासा राष्ट्रपती भवनातून नुकताच करण्यात आला. त्यामुळं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली होती. या संदर्भात पवारांनी आज पुण्यातील भोसरी इथं पत्रकारांशी बोलताना त्यांची बाजू मांडली. ‘माझ्या सचिवांनी बैठक व्यवस्थेबद्दल दोनवेळा चौकशी केली होती. मात्र, दोन्ही वेळी एकच उत्तर देण्यात आलं. कुणाकडून तरी त्रुटी राहिली असण्याची शक्यता आहे. मात्र हा विषय आता संपवायला हवा,’ असं ते म्हणाले.