नरेंद्र मोदी २.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प ५ जुलैला

134

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत धडाकेबाज विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींनी गुरुवारी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी २४ जणांनी कॅबिनेट आणि ३३ जणांनी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आज सकाळी मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आल्यानंतर अर्थसंकल्पाची तारीखही ठरवण्यात आली. नरेंद्र मोदी २.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प ५ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण सादर करणार आहेत.

निर्मला सीतारमण या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत. इंदिरा गांधी यांनी १९७० ते १९७१ या दरम्यान पंतप्रधान पदासोबतच अर्थमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. शेतकऱ्यांसाठीची धोरणे, रोजगार, शिक्षण आणि सध्या पटरीवरुन खाली उतरलेल्या औद्योगिक क्षेत्रासाठी निर्मला सीतारमण कोणत्या योजना सादर करणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. नरेंद्र मोदी सरकार निवडणुकीत प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनातील किती आश्वासने या अर्थसंकल्पात पूर्ण करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.