पुण्याची लाईफलाईन ‘पीएमपी’चा सीएनजी पुरवठा आज मध्यरात्रीपासून बंद, १,२३५ बसेस पडणार बंद

213

पुणे– महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसेसना सीएनजीचा (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) पुरवठा आजपासून (दि .२४ मे) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुण्याची लाईफलाईन असणाऱ्या पीएमपीच्या ताफ्यातील सीएनजीवर चालणाऱ्या १ हजार २३५ बसेस बंद पडणार आहेत.

मागील २ वर्षांपासून असलेली थकबाकी आजमितीस रुपये ४७ कोटी २२ लाख पर्यंत पोहोचली आहे. याबाबत एमएनजीएलकडून वेळोवेळी पत्रव्यवहार केला गेला. मात्र, थकबाकी कमी करण्याबाबत पीएमपीएमएल कडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने हा निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे वाणिज्यिक संचालक संतोष सोनटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक सुप्रियो हलदर, सरव्यवस्थापक सुजित रुईकर, मुख्य वाणिज्यिक अधिकारी एस. चंद्रमोहन, मुख्य व्यवस्थापक (वाणिज्य) मयुरेश गानू, सरव्यवस्थापक (मार्केटिंग) मिलिंद ढकोले आदी उपस्थित होते.

सुप्रियो हलदर म्हणाले, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा गेल इंडिया लिमिटेड व भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांचा संयुक्त उपक्रम आहे. या कंपनीमध्ये महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र औद्योगिक महामंडळातर्फे भाग भांडवल गुंतवलेले आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसेसना सीएनजीचा पुरवठा एमएनजीएल मार्फत केला जातो. गेल्या अनेक दिवसांपासून पीएमपीएमएल प्रशासनाकडून गॅस पुरवठ्याची रक्कम वेळेवर दिली जात नसल्याने आजमितीस सुमारे रुपये ४२ कोटी २२ लाख थकबाकी शिल्लक आहे.

संतोष सोनटक्के म्हणाले, एमएनजीएलतर्फे वारंवार शासनाच्या सर्व स्तरांवर पत्रव्यवहार, प्रत्यक्ष भेटून याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मात्र, त्याबाबत कोणताही समाधानकारक प्रतिसाद किंवा कार्यवाही झाली नाही. त्याबाबत पीएमपीएमएल कडून प्रत्येकवेळी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत मिळणाऱया अनुदानाची थकबाकी असल्याचे कारण सांगण्यात येते. त्यामुळे पीएमपीएमएल कडून एमएनजीएलला मिळणारी रक्कम म्हणजेच थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायाने एमएनजीएलची इतरांची व बँकेची देणी वाढत आहेत. त्यामुळे पीएमपीएमएलला सीएनजीचा पुरवठा बंद करण्यात येत आहे. जोपर्यंत संपूर्ण थकबाकी मिळणार नाही, तोपर्यंत हा पुरवठा सुरु करण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.