फुकटचे रुबाब आता कारवाईच्या कचाटय़ात!

184

शहरात फिरतेय ‘पोलीस स्टिकर’ लावलेले संशयास्पद वाहन

चार दिवसांपूर्वी ‘ऑन इलेक्शन डय़ूटी’, असे स्टिकर लावून वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडून त्याला महसूल विभागाने तब्बल 3 लाखापेक्षा अधिक रक्कमेची दंडात्मक कारवाई केली. निवडणुकीच्या काळात प्रशासन सतर्क असताना सुध्दा ‘पोलीस स्टिकर’ लावलेले एक चार चाकी वाहन गेली काही दिवस शहरातून संशयास्पद फिरताना दिसते. बंदोबस्तावर असलेले काही होमगार्ड सुध्दा त्या गाडीत बसलेल्या युवकाला सॅल्यूट करताना दिसतात. मात्र, चौकशीअंती पोलीस प्रशासनाची ही गाडी नसल्याचे समजते.

त्यामुळे फुकटचा रुबाब दाखवण्यासाठी पोलीस, प्रेस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, ऑन डय़ूटी इलेक्शन अशी स्टिकर लावलेल्या वाहनातून काही गैरप्रकार होण्याची शक्यता असून ती संशयाच्या भोवऱयात आणि कारवाईच्या कचाटय़ात अडकणार आहेत. अशा वाहनांच्यावर तगडय़ा कारवाईची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पोलीस, प्रेस, महाराष्ट्र शासन, भारत सरकार, ऑन डय़ूटी इलेक्शन अशी बोगस स्टिकर लावणे हा फुकटचा रुबाब कायद्याने गुन्हा असून त्यांच्यावर कडक कारवाई कोणी करत नाही, यामुळे अशी अनेकजण बदमाशी करताना दिसतात. आरटीओ आणि पोलीस प्रशासनाने याबाबत कडक कारवाईचा हिस्सका दाखवल्या शिवाय अशी बदमाशी बंद होणार नाही. तसेच अशा बोगस स्टिकर लावलेल्या वाहनातून काही गैरप्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अनेकजण बोलतात. मात्र, प्रशासनाकडून कारवाई शून्य होताना दिसत असून ठोस भूमिका महत्त्वाची आहे.

जिल्हय़ात अशा बोगस स्टिकर वाहनातील व्यक्तीची सत्यता समजत नसल्याने अशा वाहनांवर कारवाई कोणी करत नाही. याचा अनेक भामटे पुरेपुर गैरफायदा घेत असतात. त्यांच्यावर कारवाईचा हिस्सका दाखवला की, फुकटचा रुबाब असे भामटे रस्त्यावर फिरताना दिसणार नाहीत, त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे.