कारवाई करणार्‍यांच्याच पदव्या नियमबाह्य : राकेश मित्तल

184

पुणे (प्रतिनिधी) :  ‘मानवाधिकार’ ‘ह्युमन राइट’ हे शब्द संस्थांनी नावात वापरू नये, असा शासकीय आदेश आहे. मात्र, आपल्या संस्थेच्या नावात मानवी हक्क नावाचा वापर करून बोगस शिक्षण संस्था असल्याची अनेक प्रकरणे उघड करणार्‍या ‘मानवी हक्क संरक्षण व जागृती’ या संस्थेच्या संस्थाचालकाच्याच पदव्या नियमबाह्य व अवैध असल्याचा आरोप दहशतमुक्त शिक्षण क्षेत्र अभियानाचे राकेश मित्तल यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

मित्तल म्हणाले, मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे संस्थाचालक मानवी हक्काचे उल्लंघन केल्याचा दबाव टाकून शिक्षण संस्थाचालकांविरोधात गुन्हे नोंदवून त्यांना नाहक बदनाम करून त्रास देत आहेत. मात्र, याच संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक हरिदास यांच्याकडे असलेल्या पदव्या नियमबाह्य व अवैध आहेत. हरिदास हे आपल्या संस्थेच्या नावात मानवी हक्क शब्द वापरून स्वत: नियमबाह्य व अवैध पदव्या घेऊन लोकांची व सरकारची दिशाभूल करीत आहेत.

संस्थेच्या नावातून मानवी हक्क शब्द वगळण्याचे आदेश :

‘मानवी हक्क संरक्षण व जागृती’ या संस्थेच्या नावातून ‘मानवी हक्क’ हा शब्द वगळण्यात यावा; अन्यथा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल,’ असा आदेश सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी दिला आहे.

मानवी हक्क संरक्षण, जागृती संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न : विकास कुचेकर

डावीकडून उपाध्यक्ष अभिषेक हरिदास व अध्यक्ष विकास कुचेकर

मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेच्या माध्यमातून अभिषेक हरिदास यांनी पुण्यातील जवळपास 35 अनधिकृत शिक्षण संस्थांची महाराष्ट्र सरकारकडे तक्रार करून अनधिकृत शिक्षण संस्थांचा गैरप्रकार उघड केला केला आहे. त्यामुळे सुडापोटी कारवाई केलेल्या काही शिक्षणसंस्थांचे चालक अर्धवट माहितीच्या आधारावर संस्थेचे उपाध्यक्ष अभिषेक हरिदास यांच्या पदव्या नियमबाह्य असल्याचा गैरसमज समाजामध्ये पसरवून संस्थेची बदनामी करत आहेत, असे संस्थाचालक विकास कुचेकर यांनी सांगितले.