मनसेचे राजनाथ सिंहांना पत्र

238

मुंबई : डिजीटल गाव असणाऱ्या हरिसालमधील सध्याच्या परिस्थितीवरून मनसे आणि विनोद तावडे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. मनसे विरुद्ध तावडे वादातून मनसेने थेट राजनाथ सिंह यांना एक पत्र पाठवले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची एक संधी द्या असे पत्र मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवले आहे.

गजानन काळे यांनी पाठवलेल्या पत्रात म्हणाले, आपल्या सुरक्षारक्षकाने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्यास रोखल्यापासून, महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या डोक्यावर परिणाम झाला असून त्यांना त्वरित मानसोपचाराची गरज आहे. त्यात कहर म्हणजे आपल्या पक्षाने त्यांना राज्याचे गृहखाते सुद्धा न देता शिक्षण खात्यावर बोळवण केली.

त्यामुळे ते दिवसेंदिवस बरसटत चालले आहेत. पक्षात कोणी गंभीरपणे घेत नसल्याने ते राज ठाकरे यांच्यावर आरोप करून चर्चेत राहू असा ‘विनोदी’ विचार करून तावडे सध्या बेताल बडबड करत आहेत. मात्र आता हे सारे त्यांच्या अंगलट येऊ लागेल आहे. तरी कृपया आपण महाराष्ट्रात येऊन एकदा या विनोदी तावडेंना आपल्या गाडीत बसू घ्यावे. जेणे करून त्यांची गृहमंत्रीपद न मिळाल्याची इच्छा जरी अपूर्ण राहिली असली तरी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या गाडीत बसण्याची इच्छा पूर्ण झाल्यामुळे ते किमान पुन्हा सामान्य माणसासारखे वागू लागतील.