वनहद्दीत टाकला जातोय राडारोडा, कचरा

159

चाकण : वनविभागाच्या कडाचीवाडी ( ता. खेड,) हद्दीत राजरोसपणे राडारोडा घेऊन येणारी आणि कचऱ्याची वाहने खाली केली जात आहेत. आळंदी फाटा परिसरातील औद्योगिक भागातील हा कचरा असून, रात्रीच्या वेळी तो या भागात आणून टाकण्यात येत असल्याचे पर्यावरण प्रेमी सांगत आहेत. मोठ्या प्रमाणावर या भागात ठिकठिकाणी अस्ताव्यस्त कचरा, राडारोडा  पडल्याचे दृश्य पहावयास मिळत आहे.

आळंदी फाट्या लगतच्या औद्योगिक क्षेत्रातील उपहारगृहे, कंपन्यामधील भंगारात न जाणारा टाकाऊ कचरा रस्त्याच्या कडेने आणून टाकण्याचे प्रकार अव्याहतपणे सुरु आहेत. प्लॅस्टिकचे कप, पिशव्या,  असा नष्ट न होणारा कचरा, टाकाऊ अन्न त्याच प्रमाणे बांधकामातील राडारोडा असे निरुपयोगी साहित्य रस्त्यालगत साचत असून, दुर्गधीमुळे या परिसरात कामानिमित्त ये – जा करणाऱ्या वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागत आहे.  मेलेल्या कोंबड्या, ओला – सुका कचरा आणि वैद्यकीय टाकावू कचरा तसेच औद्योगिक कचरा राजरोजपणे व बिनदिक्कत पणे टाकला जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी आळंदी रस्त्यावर वन जमिनीत कचरा टाकणार्या चौंघावर दंडात्मक कारवाई करून सतरा हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवस बंद झालेले हे प्रकार पुन्हा सुरु झाले आहेत.