एल्गार परिषदेच्या खटल्याशी एकबोटे आणि भिडेंचा संबंध नाही

192

सरकारी पक्षाचा न्यायालयात युक्तिवाद : एल्गार प्रकरणात अटकेत असलेले आरोपी बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य

पुणे : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर भिमा कोरेगाव दंगलीच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा आणि एल्गार परिषदेच्या खटल्याचा संबंध नसल्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी बुधवारी न्यायालयात केला. या प्रकरणी अटक आरोपींच्या जामिनावर युक्तिवाद करताना दोन प्रकरणे एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरेगाव भिमा हिंसाचाराच्या खटल्याच्या पलीकडे एल्गार परिषद प्रकरणाचा कट शिजला असल्याचे यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याचे अ‍ॅड. पवार म्हणाल्या.

सुधीर ढवळे, रोना विल्सन, वरावरा राव, महेश राऊतसह इतर आरोपींच्या जामिनावर विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुदर्शन पहाडसिंग आणि रामटेके या दोन नक्षलवाद्यांचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला आहे. एल्गार प्रकरणात अटकेत असलेले आरोपी बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी दलित, अल्पसंख्याकांना संघटित करून माओवादी धोरणांचे पालन करण्याची भूमिका बजावली. अशांतता पसरविण्यासाठी निधी पुरविण्याचे व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे कामकाज केले. भूमिगत कार्यकर्त्यांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उभा केला, असे त्यांच्या जबाबातून समोर आले आहे.

माओवादी चळवळीशी जोडल्या गेल्याने महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील जंगलात गेलो. तेथे मिलिंद तेलतुंबडे आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना भेटलो. माओवादी नेते गणपती आणि जी.एन. साईबाबा यांना अ‍ॅड. सुरेंद्र गडलींग यांनी कशी मदत केली. मिलिंद तेलतुंबडे यांनी 12 बोरगन, 200 काडतुसे दिले. भूमिगत सोनू भूपती याने अमेरिकी बनावटीचे पिस्तूल आणि 20 काडतुसे दिल्याचे रामटेके याच्या जबाबात नमूद आहे. तर पहाडसिंग याने त्याच्या जबाबात स्फोटक द्रव्याच्या खरेदीसाठी योजना तयार करण्यासाठी हैदराबादच्या भूमिगत मूर्ती याच्या संपर्कात आल्याचे सांगितले आहे, अशी माहिती अ‍ॅड. पवार यांनी न्यायालयाला दिली.