स्वातंत्र्य मिळालं तरीही आपण पारतंत्र्यात : नागराज मंजुळे

458

पुणे, दि. ७ – स्वातंत्र्य हे मूल्य सगळ्यात भारी आहे. पण त्या खालोखाल सगळ्यात भारी मूल्य कोणतं असेल तर ते प्रेम हे आहे. प्रेम करणं ही माणसाची आंतरिक उर्मी आहे, या उर्मीला दाबलं जात असल्यामुळं आजही आपण पारतंत्र्यात आहोत, असं मत सुप्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं. ‘अक्षर मानव’ आयोजित ‘संवाद सहवास’ या कार्यक्रमात ते बोलत होते. मुर्टी-मोढवे येथील यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा इथं शनिवारी दिवसभर झालेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातून १६० जण सहभागी झाले होते. ‘अक्षर मानव’चे संस्थापक ज्येष्ठ लेखक राजन खान यांनी या कार्यक्रमामागील भूमिका समजावून सांगितली आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली.

‘आजकाल मला गर्दीची दहशत वाटते. गर्दीत जायला नको वाटतं. गर्दीतून एखादा चेहरा येतो, तो माझ्याबरोबर सेल्फी काढतो आणि सेल्फी काढल्या काढल्या निघूनही जातो. एखाद्याचं पाकीट मारलं गेल्यावर त्याला जसं वाटेल तसंच काहीसं मला या सेल्फी घेणाऱ्यांबाबत वाटतं. एका शब्दाचाही संवाद करायला ते उत्सुक नसतात. त्यामुळं मी जाहीर भाषणं बंद केली आहेत. पण इथं मला मजा येतेय. खूप दिवसांनी मी अशा पद्धतीचा संवाद साधायला आलो आहे’, हे अधोरेखित करून मंजुळे यांनी बोलायला सुरुवात केली.

मंजुळे म्हणाले, ‘‘गौतम बुद्धांसारख्या कितीतरी हुशार, शहाण्या माणसांनी माणसाच्या आंतरिक उर्मीला जपलं पाहिजे, हे सांगून ठेवलं आहे. स्वातंत्र्य, प्रेम या मूल्यांची ओळखही याच शहाण्या माणसांनी करून दिली आहे. आपल्या इथं लोक रस्त्यात मारामारी करू शकतात, थुंकू शकतात, पण कुणीही रस्त्यात एकमेकांना मिठी मारू शकत नाही. द्वेष करणाऱ्या माणसांचे सत्कार होताना दिसतात. पण प्रेम मात्र गुपचूप करावं लागतं. प्रेम ही खूप सुंदर भावना आहे. स्वातंत्र्यानंतर कोणतं मूल्य महत्त्वाचं असेल तर ते प्रेम हेच आहे.’’

‘तुम्ही हॉरर फिल्म भविष्यात बनवणार का?’ या प्रश्नावर नागराज म्हणाले, तुमच्या शेजारी बसलेला माणूस तुमच्या जातीचा नाही, ही भावना मनात येणं, हेच मला खूप हॉरर वाटतं.’ खरंतर आपल्याइथं एकट्या माणसांनी खूप मोठी कामं करून दाखवली आहेत. शिवबा, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, र.धों. कर्वे, बाबासाहेब आंबेडकर यांनी जे काम करून ठेवलं ते एकत्र समूहाला करता आलं नाही. त्यांनी जे सांगितलं ते अंमलात आणता आलं नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

‘‘मी स्वतःवर खूप प्रयोग केले. महाविद्यालयात असताना मौन धरायचो. मौनात एक मजा आहे. मौन हे दैवी नाही. त्यामुळे अनेक शक्यता टळतात, शिवाय विचारांची गतीही वाढते, असं सांगून पूर्वीचे माझ्यासमोरचे प्रश्न वेगळे होते आता वेगळे आहेत. जगताना आपल्या आयुष्यात पुढं काय होईल हे माहीत नसणं यातच एक गंमत आहे. त्यामुळं जगताना जे वाट्याला येतं, त्याची मी मजा घेतो. रोज मी आनंदी होतो, तसाच रोज मी दुःखी होतो, उदास होतो. कधी कधी करमतही नाही, या सगळ्याच गोष्टी जगण्यात असणार. तेच तर जगणं आहे’’, असेही त्यांनी सांगितले.

करमाळ्यातलं जगणं, मित्रमंडळींबरोबरचा सहवास, यश, कुटुंब, प्रेम, वाचन, तरुणाई अशा विविध विषयांवर नागराज मंजुळे यांनी आपली मतं व्यक्त केली. तसंच पिस्तुल्या, फँड्री, सैराट, पावसाचा निबंध या त्यांच्या कलाकृतीच्या अनुषंगानंही त्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. उदय प्रकाश, अरुण कोलटकर आणि स्वतःच्या कवितांचंही मंजुळे यांनी वाचन केल्यानं कार्यक्रमाची रंगत वाढली.

शिवाजी महाराजांवर चित्रपट बनविण्याची इच्छा : जवळ काहीही नसताना शिवाजीसारखा हा माणूस स्वराज्याच्या प्रेरणेनं उभा राहतो. त्यांची आई जिजाऊ त्याला प्रेरित करते. आणि मावळ्यांच्या मदतीनं वेगवेगळ्या युद्ध कौशल्य शोधून काढत हा माणूस स्वराज्याची निर्मिर्ती करतो. शिवाजीचा हा प्रवास मला खूप भारी वाटतो. त्यामुळंच शिवाजी महाराजांवर चित्रपट करण्याची मला इच्छा आहे, असंही नागराज मंजुळे यांनी सांगितलं.