यशस्वीतेसाठी इच्छाशक्ती, आत्मविश्वास महत्वपूर्ण : डॉ. अनुराग बत्रा

214

‘वुमेन प्रोवेस’मध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मान

पुणे : “स्वप्न प्रत्येकाने पाहावीत. स्वप्नपूर्तीसाठी झोकून देत मेहनत घ्यावी. आपण जे बोलतो आणि करतो, त्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवावा. आपल्यातील इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास प्रबळ असेल, तर प्रत्येक क्षेत्रात आपण यश मिळवू शकतो,” असे मत बिझनेसवल्ड आणि एक्सचेंजफोरमीडियाचे चेअरमन डॉ. अनुराग बत्रा यांनी व्यक्त केले.

समाजातील महिलांनी स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवत, आपल्यातील कलागुणांना वाव देऊन स्वयंसिद्ध व्हावे, या उद्देशाने होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर संचालित इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी आणि नटराजन एज्युकेशन सोसायटी (एनईएस) यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ‘होप फाउंडेशन’च्या अध्यक्षा अरुणा कटारा, ‘एनईएस’चे संस्थापक विश्वस्त डॉ. गणेश नटराजन, ग्लोबल टॅलेंट ट्रॅकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमा गणेश आदी उपस्थित होते.

हिंजवडी येथील होप फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या मोहिनी छाब्रिया कॉन्व्हेंशन सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात तुडीप सॉफ्टवेअरच्या सहसंस्थापक दीप्ती अगरवाल, ईझेस्टच्या मार्केटिंग हेड जानकी संपत,  सोशल वेंचर पार्टनर्स पुणे चॅप्टरच्या महाव्यवस्थापक पारुल वैद्य, लेक्ट्रोलेक लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी उमा निडमारती, बीडब्ल्यू बिझिनेस वल्डच्या उपाध्यक्ष शीतल खारका यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित ‘नवी आशा, उभरते व्यक्तिमत्व : नव्या महिलांची ओळख’ विषयावरील परिसंवादाचे समन्वयन डॉ. उमा गणेश यांनी केले. सर्वसामान्य स्त्री ते यशस्वी महिला उद्योजिका असा प्रवास सन्मानित महिलांनी उलगडला.

डॉ. अनुराग बत्रा म्हणाले, “समाजात आणि उद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण करण्यासह इतर अनेकांना नोकरीच्या संधी देण्याचे काम या महिलांनी केले आहे. चांगला हेतू कधीच निष्फळ ठरत नाही. प्रेम, करुणा, दयाळूपणा, वचनबद्धता या स्त्रियांमधील गुणधर्मामुळे यशस्वी उद्योजक होण्यास मदत होते. आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून ठराविक मार्गावर चालत राहिल्यावर यश नक्की मिळेल.”

अरुणा कटारा म्हणाल्या, “गेल्या काही वर्षांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना सन्मानित करून तरुणींना चांगले करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. यंदा महिला उद्योजिका आणि करिअर घडविणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आदर्श ठेवला आहे.” कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स यांसारखे नवतंत्रज्ञान येत असल्याने सध्या सर्वच पातळ्यांवर खूप स्पर्धा वाढल्या आहेत. येणाऱ्या या तंत्रज्ञानाचा वापर करून महिलांनी यशस्वी उद्योजक होण्याची गरज असल्याचे डॉ. नटराजन यांनी नमूद केले.