लोणावळा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा

300

लोणावळा – लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय तथा लोणावळा महाविद्यालयात मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी भाषादिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ग्रंथ आणि भित्तिपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास पाटील म्हणाले की, मोबाईल हाताळण्यापेक्षा ग्रंथ हाताळले, तर आपण ज्ञान संपन्न होतो, असे सांगून मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या. मराठी विभाग प्रमुख डॉ. रवींद्र कडू यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषादिनाचे महत्व सांगितले.

डॉ. राजेंद्र देवरे यांनी म्हणींचे संकलन करून प्रदर्शनात प्रदर्शित केल्या. वैविध्यपूर्ण दूर्मिळ साहित्याचे ग्रंथप्रदर्शन तसेच पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, राम गणेश गडकरी, कुसुमाग्रज यांचे साहित्य, छायाचित्रे आणि विविध म्हणींची भित्तीपत्रके तयार करून या प्रदर्शनात लावण्यात आली होती. ज्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. या कार्यक्रम प्रसंगी प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित गरुड यांनी केले. या वेळी कौमुदिनी पुंडे यांनी मराठी भाषा गौरवपर गीतगायन केले. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागाने ग्रंथालय विभाग व सांस्कृतिक विभागाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने केले.