वाहन विक्रेत्यांनी रस्त्याचे केले “पार्किंग’

286

भोसरी – वाहन विक्रेत्यांनी टेल्को रस्ता बळकावला आहे. शोरुममध्ये येणारी वाहने, विक्री तसेच चाचणीची वाहने रस्त्यावरच उभी केली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यावर वर्दळीच्या वेळी वाहतूक कोंडी होत आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी नो पार्किंगचा फलक असताना मोठ्या प्रमाणात होत असलेली पार्किंग वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत आहे. या वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.

केएसबी चौकातून पुणे-नाशिक रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून टेल्को रस्त्याची ओळख आहे. या रस्त्यावरच जगप्रसिध्द टाटा कंपनीचे प्रवेशद्वार देखील आहे. त्या बरोबरच चाकण, आळंदी, मरकळ, रांजणगाव कडून टाटा कंपनीमध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसेच भोसरी एमआयडीसीतील कोणत्याही भागात जाण्यासाठी या रस्त्याचाच वापर शहरातील वाहन चालकाकडून केला जात असतो. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहतुकीचे प्रमाण सर्वाधिक आहे. याचाच फायदा घेण्यासाठी या रस्त्यावर गवळीमाथा व यशवंतनगर याठिकाणी काही नवीन चारचाकी वाहनांच्या विक्रीची मोठमोठी शोरुम उघडली गेली आहेत.

या शोरुमला भेट देण्यासाठी व सर्व्हिसिंगसाठी चारचाकी वाहनांची भलीमोठी रांग लागलेली असते. परंतु, या रांगेने भोसरीकडून केएसबी चौकाकडे जाणारा गवळीमाथ्या जवळील रस्ता पुर्णपणे व्यापलेला असतो. यामुळे इतर वाहनांना तेथून पुढे जाणे अवघड होऊन बसते, तर काहीवेळी वाहनेच पुढे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन तासन्‌तास वाहने एकाच जागेवर उभी राहिलेली पाहण्यास मिळतात.

या शोरुमवाल्यांचे स्वतःहाचे पार्किंग असताना देखील तेथील सुरक्षा रक्षकांकडून आलेल्या वाहनांना रस्त्याच्या कडेलाच वाहने लावण्यास सांगितले जाते. त्यामुळे सर्रास रस्त्यावर पार्किंग होत आहे. अनेकदा वायसीएम रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांना देखील रूग्ण घेऊन जाताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याबाबत भोसरी वाहतूक पोलीस विभागाला कळवून देखील ते याबाबत कोणतीच उपाय योजना करत नसल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

सुट्टीच्या दिवशी रस्ता ब्लॉक

सध्या टेल्को रोडवर वाहन शोरुमवाल्यांनी आपली खासगी पार्किंग निर्माण केली आहे. त्यामुळे भोसरीकडून थरमॅक्‍स चौकात अथवा चिंचवडकडे जाण्यास मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. गुरुवार, शनिवार व रविवार या दिवशी हा रस्ता पुर्णपणे बंद असल्याचाच भास येथे लावलेल्या वाहनांमुळे होतो. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी नागरिक या रस्त्याचा वापर टाळत आहेत. पर्यायी व वळसा घालून अन्य रस्त्यांचा वापर करावा लागत असल्याचा संताप वाहन चालक व्यक्त करीत आहेत.