स्वराज्याच्या तेजःसूर्याचा इतिहास उलगडणारे महानाट्य ‘शिवपुत्र संभाजी’

418

बारामतीत पार पडला शुभारंभाचा प्रयोग

मोठ्या वृक्षांच्या छायेत लहान वृक्ष वाढत नाहीत या वाक्याला छेद देत ज्यांनी आपल्या पित्याने कमावलेला नावलौकिक आणि त्यांची कीर्ती स्वकर्तृत्वाने दिगंतराला नेली ते स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज. धर्मशील, शौर्यपती, रणधुरंदर, भाषाकोविद, ही विशेषणं ज्यांच्यावर खुलून दिसतात, शास्त्रविद्या आणि शस्त्रकला या दोन्हीत पारंगत असणाऱ्या शंभूराजांचा चरित्रगौरव सांगणारं ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. ‘ज्योतीचंद भाईचंद सराफ’ प्रस्तुत आणि महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या शुभारंभाचा प्रयोग मिशन हायस्कूल मैदान, बारामती येथे सौ. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते तब्बल १०००० रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून शंभूराजे म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनात ज्यांनी अढळ स्थान मिळवले आहे असे ‘डॉ. अमोल कोल्हे’ या नाटकात छत्रपती संभाजी महाराजांची मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. या महानाट्याच्या शुभारंभाच्या प्रयोगाप्रसंगी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतले शंतनू मोघे, स्नेहलता वसईकर, पल्लवी वैद्य, अनिल गवस, नंदू पाटील, प्रदीप कोतमिरे हे कलाकार आपल्या व्यस्त दिनक्रमातून आवर्जून वेळ काढून नाटकाच्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी बारामतीत उपस्थित होते.

‘शंभूराजांचा पराक्रम मालिकेच्या माध्यमातून बघणे जेवढे रोमांचकारी आहे तेवढेच महानाट्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष समोर पहाणे सुद्धा रोमहर्षक आहे त्यामुळे २६ फेब्रुवारी पर्यंत समस्त बारामतीकरांनी ‘शिवपुत्र संभाजी’ हे महानाट्य आवर्जून बघावे’ असे आवाहन मालिकेतल्या कलाकरांनी केले. दिनांक २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी या दरम्यान सायंकाळी ६.०० वाजता ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याचा अनुभव मिशन हायस्कूल मैदान येथे बारामतीकारांना घेता येणार आहे. या महानाट्याची तिकीट प्रयोगाच्या ठिकाणी उपलब्ध आहेत.