श्रीराम मंदिरासमवेत हिंदु-राष्ट्राच्या स्थापनेचाही अध्यादेश काढा : मनोज खाडये

165

चिखली येथील हिंदु राष्ट्र जागृती सभेत हिंदु राष्ट्र स्थापनेची हाक

चिखली (जिल्हा पुणे ) : हिंदूंची पवित्र क्षेत्रे असलेल्या मथुरा, काशी यांसह देशातील ४० सहस्र मंदिरांना पाडून त्या ठिकाणी मशिदी उभारण्यात आल्या आहेत. श्रीराम मंदिरासमवेत या मंदिरांचेही निर्माण व्हायला हवे. देशातील सर्व मंदिरांच्या सुरक्षेसाठी अयोध्येतील श्रीराम मंदिरासमवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचाही अध्यादेश काढा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि गुजरात प्रांताचे समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. येथील गजानन म्हेत्रे उद्यानाच्या मैदानात झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत ‘हिंदु राष्ट्र्राची आवश्यकता आणि दिशा’ या विषयावर  ते बोलत होते. या प्रसंगी सनातन संस्थेच्या धर्मप्रसारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. पंचक्रोशीतील 3 सहस्र हिंदू बांधव या सभेला उपस्थित होते.

सभेच्या प्रारंभी शंखनाद आणि त्यानंतर दीपप्रज्वलन झाले. अधिवक्ता नीलेश सांगोलकर यांनी व्यासपिठावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. वेदमंत्रपठण झाल्यानंतर मुख्य सभेला प्रारंभ झाला. या वेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या वेळी श्री. पराग गोखले यांनी हिंदु  जनजागृती समितीच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. उपस्थितांमध्ये वीरश्री जागवणार्‍या या सभेचे सूत्रसंचालन श्री. चैतन्य तागडे यांनी केले.

हिंदूंनी धर्माचरण करून भगवंताची कृपा संपादन करणे आवश्यक ! –  सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

‘सनातन’ या नावाची भीती समाजात निर्माण व्हावी आणि समाज संस्थेपासून दूर व्हावा, अशी काँग्रेसची कुटनीती आहे. यासाठी अन्वेषण यंत्रणांनी नवनवीन मसालेदार कथा रचत सनातन संस्थेचा ‘क्षात्रधर्म साधना’ हा ग्रंथ वाचून गौरी लंकेश यांची हत्या केल्याचा जावईशोध लावला. आता स्वत:ला हिंदुत्वनिष्ठ म्हणवणार्‍यांचे सरकार सत्तेत असूनही तीच नीती चालू आहे. हिंदु राष्ट्राचा उद्घोष करत असल्यानेच सनातन संस्थेची मुस्कटदाबी केली जात आहे; मात्र ‘कोंबडा कितीही झाकला, तरी सूर्य उगवतोच’ हे धर्मविरोधकांनी लक्षात घ्यावे. वर्ष 2023 मध्ये हिंदु राष्ट्राची पहाट होणारच आहे; मात्र त्यासाठी हिंदूंनी धर्माचरण करून भगवंताची कृपा संपादन करणे आवश्यक आहे.

ढोंगी धर्मनिरपेक्षतेवर हिंदु राष्ट्र, हाच एकमेव उपाय ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर

अखलाख आणि मोहसीन शेख यांची हत्या झाल्यानंतर सरकारने त्यांच्या कुटुंबियांना अनुक्रमे 45 लाख आणि 10 लाख रुपये दिले; मात्र कोरेगाव भीमा दंगलीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले जॅकेट घातले म्हणून ज्या राहुल फटांगडे या युवकाची हत्या झाली, त्याच्या कुटुंबियांना केवळ 5 लाख रुपये दिले गेले. ही कसली धर्मनिरपेक्षता ? सध्याच्या धर्मनिरपेक्ष राज्यात मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने विकासकामाच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या मंदिरांमधील पैशांवर डल्ला मारला जात आहे; मात्र अन्य धमर्र्स्थळामधील पैशांचा विचारही केला जात नाही. ही ढोंगी धर्मनिरपेक्षता आहे. त्यावर हिंदु राष्ट्राची स्थापना, हाच एकमेव उपाय आहे.