पतीच्या इलाजासाठी आलेल्या पत्नीवर मांत्रिकाचा बलात्कार

156

पुणे : आजारी पतीला बरे करण्यासाठी आलेल्या मांत्रिकाने त्याच्याच पत्नीला मंत्रतंत्र करुन गुंगीचे पेय देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार येरवड्यात घडला.या प्रकरणी येरवडा पोलिसांनी मांत्रिक शब्बीर युनुस शेख(वय ४५,रा.कोंढवा सध्या रा.लक्ष्मीनगर येरवडा) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन अटक केली. या प्रकरणी सरकारी वकिल अँड.वामन कोळी यांनी तपासासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस.पानसरे यांनी आरोपीला १३ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

येरवडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिडित महिलेची २०१५ मध्ये पुणे रेल्वेस्टेशनवर ओळख झाली होती. मी महाकालीचा भक्त असून मी पैसे न घेता लोकांना बरे करतो असे शब्बीर याने सांगितले होते. पिडित महिलेचे पती अनेक दिवसांपासून आजारी असल्यामुळे तिने पतीच्या उपचारासाठी त्याच्या घरी नेले. त्याने घरी पतीवरुन लिंबु कापुर यांचा उतारा टाकून त्याच्या अंगात भुतबाधा झाली असून त्यासाठी त्या महिलेला पाण्यात गुंगीचे पेय देय देऊन बेशुद्ध करुन बलात्कार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पतीला बरे करण्यासाठी वेळोवेळी उतारे व जादूटोणाकरण्यासाठी सुमारे साडेतीन लाख रुपये घेतले.

याप्रकरणी येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपी शब्बीर शेख याला अटक केली आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक एस.एस.मगदूम करीत आहेत.