‘आयसीएआय’च्या ‘सीसीएम’पदी चंद्रशेखर चितळे

165

‘आरसीएम’पदी आनंद जाखोटिया, अरुण गिरी व यशवंत कासार यांची निवड

पुणे : दि इन्स्टिट्यूशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) कमिटीवर पुण्यातील सीए चंद्रशेखर चितळे यांची सेंट्रल कौंसिल मेंबर म्हणून, तर सीए आनंद जाखोटिया, सीए अरुण आनंदागिरी व सीए यशवंत कासार यांची ‘रिजनल कौन्सिल मेंबर’ म्हणून निवड झाली आहे. पुणे शाखेतुन एक सीसीएम आणि तीन आरसीएम निवडून येण्याची ही पहिलीच वेळ असून, पुण्यासाठी ही आनंदाची बाब आहे.

२४ व्या सेंट्रल कौन्सिलसाठी व २३ व्या रिजनल कौन्सिलसाठीची निवडणूक गेल्या महिन्यात झाली. त्यात पुण्यातून निवडून आलेले ‘सीसीएम’ चंद्रशेखर चितळे आणि ‘आरसीएम’ आनंद जाखोटिया, अरुण आनंदागिरी व यशवंत कासार यांचा पुणे आयसीएआयच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापकीय समितीच्या सदस्या सीए रेखा धामणकर, सचिव सीए राजेश अगरवाल, सीए सचिन परकाळे, पुणे आयसीएआयचे खजिनदार सीए अभिषेक धामणे आदी उपस्थित होते.

‘आरसीएम’ पश्चिम विभागासाठी पुण्यातील ८००० सीए व २५ हजार सीए करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणार आहेत. १९६२ मध्ये सुरु झालेली पुणे शाखा भारतातील तिसऱ्या क्रमांकाची शाखा आहे. पश्चिम विभागात पुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, सुरत, अहमदाबाद, गोवा, बडोदा आदी शाखांचा समावेश आहे. केंद्रीय स्तरावर सीए व्यावसायिकांसाठी चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे चितळे यांनी नमूद केले. जाखोटिया, आनंदागिरी व कासार यांनीही आपल्या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत सीएंसाठी भरीव काम करणार असल्याचे सांगितले.