राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘धप्पा’ चा फर्स्ट लुक प्रदर्शित

208

१ फेब्रुवारी २०१९ रोजी मिळणार धप्पा’!

लहानपणी लपाछपी खेळताना तुम्हाला किती वेळा ‘धप्पा’ मिळालाय? किंवा तुम्ही इतरांना किती वेळा ‘धप्पा’ द्यायचा हे आठवते का? लहानपणीचे ते दिवस किती सुंदर होते याची आठवण आपल्या मनात कुठेतरी घर करून बसलेली असते. आपण मोठे होतो तशी आपल्यातील ही निरागसता हरवून बसतो. प्रश्न विचारण्याचं धाडस हरवून बसतो. ‘चलता है यार’ किंवा ‘हे असंच असतं’ अशी काहीशी उत्तरं दररोजच्या समस्यांना मिळताना दिसतात. तीच बालपणीची निरागसता, त्या निरागस्तेतून आलेलं धाडस आपल्याला निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या ‘धप्पा’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

विशबेरी फिल्मस् प्रस्तुत, इंक टेल्स आणि अरभाट फिल्म्स निर्मित ‘धप्पा’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. या फर्स्ट लूक मध्ये काही लहान मुले गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर घोळका करून बसल्याचे दिसतात. याबरोबरच तिथे काही भगवे झेंडे, क्रॉस, झाडे दिसत आहेत. यामुळे ‘धप्पा’ मध्ये नेमके काय आहे, याची उत्सुकता ताणली गेली आहे. गिरीश पांडुरंग कुलकर्णी लिखित, निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित,  ‘धप्पा’ या चित्रपटाचे निर्माते सुमितलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत. या चित्रपटाला ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’ (राष्ट्रीय एकात्मता) पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. तसेच भारत सरकारच्या वतीने आयोजित इंटरनॅशन फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (इफ्फी) मध्ये या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग झाले आहे. ‘धप्पा’ चित्रपटामध्ये काय दडले आहे? कोणते कलाकार आहेत? हे लवकरच समजणार आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.